प्रेमप्रकरण की स्पर्धा परीक्षेचा तणाव? जालन्याचा तरूणाने छत्रपती संभाजीनगरात संपवले जीवन
By बापू सोळुंके | Updated: April 8, 2023 20:06 IST2023-04-08T20:06:01+5:302023-04-08T20:06:27+5:30
तरूणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसले तरी प्रेमप्रकरणातून हे टोकाचं पाऊल उचलल्याचे नातेवाईक आणि मित्रांमध्ये चर्चा आहे.

प्रेमप्रकरण की स्पर्धा परीक्षेचा तणाव? जालन्याचा तरूणाने छत्रपती संभाजीनगरात संपवले जीवन
छत्रपती संभाजीनगर: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २३ वर्षीय तरूणाने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास समोर आली. तरूणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसले तरी प्रेमप्रकरणातून हे टोकाचं पाऊल उचलल्याचे नातेवाईक आणि मित्रांमध्ये चर्चा आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ओंकार अरूण कपे (.ह. मु.समर्थ नगर, मूळ रा. पाथरूड, ता.जि.जालना )असे मृत तरूणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार देवगिरी महाविद्यालयात एम एस्सी. पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ओंकार दोन वर्षापासून स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी शहरात राहात होता. यासोबतच तो गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटचे व्यवहार करीत होता, असे त्याच्या मित्रांनी सांगितलं होत. शुक्रवारी रात्री सात वाजेच्या सुमारास त्याचे मित्र त्याच्या खोलीवर गेले. तेव्हा आत असलेला ओंकार दरवाजा ठोठावूनही दार उघडत नसल्याने त्यांनी या घटनेची माहिती क्रांतीचौक पोलिसांना कळविली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दार तोडून आत जाऊन पाहिले तेव्हा ओंकारने छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. या नंतर त्याला तातडीने खाली उतरवून बेशुद्धावस्थेत घाटीत नेण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अपघात विभागातील डॉक्टरांनी ओंकारला तपासून मृत घोषित केले. या तरूणाच्या आत्महत्येचे अचूक कारण समजू शकले नाही, असे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले. मात्र या आत्महत्येला त्याचे प्रेमप्रकरण कारणीभूत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. परंतु याविषयी अधिकृत तक्रार त्यांच्याकडून पुढे आली नसल्याचे पो.नि.पाटील यांनी नमूद केले. याविषयी क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार शेख अर्शद, हेडकॉन्स्टेबल अशोक साळवे तपासकरीत आहेत.