जीव धोक्यात घातला! अंजना नदीच्या पुरात बाईक वाहून गेली, चालक थोडक्यात बचावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 14:31 IST2025-09-30T14:30:21+5:302025-09-30T14:31:35+5:30
सिल्लोड तालुक्यातील उपळी गावाजवळील घटना

जीव धोक्यात घातला! अंजना नदीच्या पुरात बाईक वाहून गेली, चालक थोडक्यात बचावला
- प्रमोद शेजुळ
भराडी (प्रतिनिधी): अंजना नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना त्यातून बाईक नेण्याचा धोका पत्करणे येथील एका चालकाला चांगलेच महागात पडले. मंगळवारी (दि. ३०) ही घटना घडली असून, पुराच्या तीव्र प्रवाहामुळे मोटारसायकल वाहून गेली, मात्र सुदैवाने चालक थोडक्यात बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपळी येथील रमेश पंडितराव शेजुळ हे काही कामानिमित्त भराडी येथे जात होते. अंजना नदीवरील पुलावरून पाणी वाहत असतानाही त्यांनी बाईक पाण्यातून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नदीच्या तीव्र प्रवाहामुळे त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ते खाली पडले. त्यांच्या डोळ्यांदेखत मोटारसायकल पुराच्या पाण्यात वाहून गेली. मात्र, प्रसंगावधान राखून रमेश शेजुळ यांनी स्वतःला वाचवले आणि ते सुरक्षित स्थळी पोहोचले.
इशारे देऊनही बेपर्वाई
उपळी येथील गावकऱ्यांनी यापूर्वीही नदीला पूर आल्यास पुलावरून वाहने न नेण्याचा इशारा दिला होता आणि अनेकदा सूचनाही लावल्या होत्या. मात्र, काही वाहनचालक या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून आपला जीव धोक्यात घालत असल्यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत. या घटनेनंतर ग्रामस्थांनी पुन्हा एकदा वाहतूकदारांना पाण्याचा अंदाज न घेता धोका पत्करू नका, असे आवाहन केले आहे.