पाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरात ठाकरेसेनेकडून रिकाम्या हंड्यांची पालखीत मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 16:52 IST2025-04-26T16:52:07+5:302025-04-26T16:52:33+5:30

आंदोलकांनी लबाड भाजप सरकारने पाणी वेळेवर दिले नाही, असा आरोप करून "लबाडांनो, पाणी द्या" अशी जोरदार घोषणाबाजी केली.

'Liars, give me water!'; Thackeray Sena parades empty pots in Chhatrapati Sambhaji Nagar | पाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरात ठाकरेसेनेकडून रिकाम्या हंड्यांची पालखीत मिरवणूक

पाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरात ठाकरेसेनेकडून रिकाम्या हंड्यांची पालखीत मिरवणूक

छत्रपती संभाजीनगर : पाण्यासाठी ठाकरेसेनेने आज शहरात 'पालखी दिंडी व अभंग आंदोलन' केले. यावेळी पालखीत रिकामा हंडा ठेवण्यात आला होता. एन-६ वसाहतीतील आविष्कार चौक ते चिश्तिया चौक दरम्यान काढण्यात आलेल्या या अनोख्या दिंडीत महिलांनी रिकाम्या हंड्यांसह नृत्य करून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदवला. 

यावेळी ठाकरे शिवसेना नेते व विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे वारकरी वेशात टाळमृदंगाच्या गजरात सहभागी झाले होते. त्यांनी आंदोलनात बोलताना सांगितले, "आज छत्रपती संभाजीनगरकरांना विठ्ठलाप्रमाणे पाण्याची आस लागली आहे. भक्ताला विठ्ठल हवा तसंच नागरिकांना पाणी हवे आहे." असे म्हणत दानवे यांनी प्रशासनावर निशाणा साधला. महिलांनी विडंबनात्मक अभंग गात प्रशासनाला चिमटे काढले. हातात टाळ, मुखावर आक्रोश आणि कमरेवर रिकामे हंडे घेऊन त्यांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या. दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत म्हटले, "२०२२ मध्ये पाणी देण्याची ग्वाही देणारे सत्ताधारी लबाड ठरले आहेत. तीन वर्षांतही पाणी मिळाले नाही. त्यामुळे 'लबाडांनो, पाणी द्या' हे जनआंदोलन सुरूच राहणार आहे."

या आंदोलनात आदर्श महिला भजनी मंडळ, संत तुकाराम महाराज भजनी मंडळ, गजानन महाराज महिला भजनी मंडळ यांच्यासह अनेक भजनी मंडळे सहभागी झाली. पेटीवादक केशव मुळे, मृदंगाचार्य अशोक जैन यांच्यासह वारकरी कलाकारांनी देखील या दिंडीत हजेरी लावली. ठाकरे शिवसेनेचे विविध पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि युवतीसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पाणी देण्याची केली मागणी
"लबाडांनो, पाणी द्या" हे ठाकरे शिवसेनेचे जनआंदोलन पुढील महिनाभर सुरू राहणार आहे. शहरातील प्रत्येक वार्डमध्ये पाण्याची समस्या आहे. वेळेवर आणि मुबलक पाणी मिळत नसल्याने शहरासाठी योग्य पाणी नियोजन करण्याची मागणी ठाकरेसेनेकडून करण्यात आली आहे. आंदोलकांनी लबाड भाजप सरकारने पाणी वेळेवर दिले नाही, असा आरोप करून जोरदार घोषणाबाजी केली.

Web Title: 'Liars, give me water!'; Thackeray Sena parades empty pots in Chhatrapati Sambhaji Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.