निवडणुकीसाठी आधी जजमेंटचा अभ्यास करू, मग आव्हानेही कळतील; राज्य निवडणूक आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 12:18 IST2025-05-07T12:17:14+5:302025-05-07T12:18:10+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने आणि सक्षमपणे पार पाडण्याचे नियोजन केले जाईल: राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

Let's first study the Supreme Court's judgment for the elections, then we will understand the challenges; State Election Commissioner Dinesh Waghmare | निवडणुकीसाठी आधी जजमेंटचा अभ्यास करू, मग आव्हानेही कळतील; राज्य निवडणूक आयुक्त

निवडणुकीसाठी आधी जजमेंटचा अभ्यास करू, मग आव्हानेही कळतील; राज्य निवडणूक आयुक्त

छत्रपती संभाजीनगर : सुप्रिम कोर्टाच्या जजमेंटचा अभ्यास केला जाईल. हा अभ्यास करून कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या, कशा पद्धतीने घ्यायच्या, हे ठरविले जाईल. या अभ्यासातून आव्हानेही कळतील. ही मोठी जबाबदारी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने आणि सक्षमपणे पार पाडण्याचे नियोजन केले जाईल, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले.

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे अति. मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांची राज्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड झाली. याबद्दल मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) दिनेश वाघमारे यांचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. या सोहळ्यानंतर दिनेश वाघमारे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधत अभ्यास करून नियोजन केले जाईल, असे सांगितले. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मनपा प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत होते, तर प्रमुख अतिथी म्हणून अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे उपस्थित होते. शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. भारत सोनवणे, डॉ. काशिनाथ गर्कळ, डॉ. सुरेश हरबडे, डॉ. एल. एस. देशमुख, डाॅ. गायत्री तडवळकर, डाॅ. वैशाली उणे-लोखंडे, आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रात ‘यूपीएससी’चा टक्का वाढावा : दिनेश वाघमारे
सत्कारप्रसंगी बोलताना दिनेश वाघमारे यांनी आपला प्रवास उलगडला. महाराष्ट्रात ‘यूपीएससी’चा टक्का वाढला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले. सामाजिक न्याय विभागात काम करताना सर्वाधिक समाधान मिळाले, असे ते म्हणाले.

‘ते’ शहरात आले अन् स्टे उठला : जिल्हाधिकारी
राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आज शहरात आले आणि सुप्रिम कोर्टाचा स्टे उठला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोग मोकळा झाला आहे. भारताचे निवडणूक आयुक्त असो की राज्याचे निवडणूक आयुक्त असो, प्रत्येकाला वाटते की, माझ्या कारकिर्दीत निवडणूक झाली पाहिजे, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले.

प्रशासक पदाचा बोजा उतरणार, महापौरांचा बंद कक्ष आज उघडला : जी. श्रीकांत
प्रास्ताविकात माझा आयुक्त तथा प्रशासक असा उल्लेख झाला. परंतु, आता थोड्याच दिवसांसाठी प्रशासक असणार आहे. हा बोजा उतरणार आहे. महाराष्ट्रात नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या आता निवडणुका होतील. आजपासूनच आम्ही तयारी सुरू केली. महापौरांचा बंद कक्ष उघडून स्वच्छ केला. खांद्याला खांदा लावून निवडणुकीसाठी फिल्डवर काम केले जाईल आणि निवडणूक चोखपणे पार पडेल, असे जी. श्रीकांत म्हणाले.

Web Title: Let's first study the Supreme Court's judgment for the elections, then we will understand the challenges; State Election Commissioner Dinesh Waghmare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.