चला नवीन प्रभाग रचना तयार करा ! नगरविकास विभागाची महापालिकांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 16:22 IST2022-04-15T16:22:30+5:302022-04-15T16:22:44+5:30
राज्य सरकारने नवीन कायदा करून प्रभाग रचना आणि सदस्य संख्या निश्चितीचे अधिकार स्वत:कडे घेतले आहेत.

चला नवीन प्रभाग रचना तयार करा ! नगरविकास विभागाची महापालिकांना सूचना
औरंगाबाद : राज्यातील मुदत संपलेल्या महापालिकांनी त्वरित प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू करावे, असे आदेश मंगळवारी नगररचना विभागाने दिले. ही प्रभाग रचना कधीपर्यंत सादर करावी, याचा कोणताही उल्लेख या आदेशात नाही. आता पुन्हा एकदा नव्याने प्रभाग रचना तयार होणार, हे निश्चित.
महापालिका प्रशासनाने चार महिन्यांपूर्वीच बहुसदस्यीय पद्धतीने प्रभाग रचनेचा आराखडा तयार करून तो राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. परंतु आता राज्य सरकारने नवीन कायदा करून प्रभाग रचना आणि सदस्य संख्या निश्चितीचे अधिकार स्वत:कडे घेतले आहेत. त्यामुळे नगर विकास खात्याने पुन्हा प्रक्रिया नव्याने सुरू केली आहे. राज्यात २२ महापालिकांची निवडणूक भविष्यात अपेक्षित आहे.
औरंगाबाद महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणार होती. मात्र, कोरोना संसर्गामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. त्याचवेळी महापालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले. वॉर्ड रचनेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयातील याचिकाही निकाली निघाली. तत्पूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून त्रिसदस्यीय पद्धतीने प्रभाग रचनेचा आराखडा तयार करून सादर करण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला होता.
आता राज्य सरकारने प्रभाग रचना आणि सदस्य संख्या निश्चितीचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडून काढून स्वत:कडे घेतले आहेत. त्यामुळे आता ही सर्व प्रक्रिया नगर विकास खात्याच्या माध्यमातून होणार आहे. त्यानुसार नगरविकास खात्याने सोमवारी महापालिका प्रशासकांना पत्र पाठवून लगतच्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या, रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ सुरू करावी, असे आदेशित केले आहे.