लग्नसराईत कायदा पायदळी; नवरीच मिळत नसल्यामुळे २४ वर्षांनी लहान मुलीसोबत विवाहाचा घाट
By राम शिनगारे | Updated: May 24, 2023 16:19 IST2023-05-24T16:17:50+5:302023-05-24T16:19:53+5:30
बालकल्याण समितीसमोर १५ दिवसात ११ बालविवाहाची प्रकरणे सादर

लग्नसराईत कायदा पायदळी; नवरीच मिळत नसल्यामुळे २४ वर्षांनी लहान मुलीसोबत विवाहाचा घाट
छत्रपती संभाजीनगर : सध्या सगळीकडे लग्नाची धूम सुरू आहे. त्यात अल्पवयीन मुलींचे लग्न आई-वडील लावून देत असल्याचे समोर येत आहे. बालकल्याण समितीसमोर मागील १५ दिवसांमध्ये ११ बालविवाह रोखल्याची प्रकरणे सादर झाली. त्यात एका विवाहात नवरीचे वय १६, तर नवरदेव ४० वर्षांचा प्रौढ होता. ४० वर्षांच्या जरठ प्रौढास लग्नासाठी मुलगीच मिळत नसल्यामुळे त्याने गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीला शोधून लग्नाचा घाट घातल्याचे बालकल्याण समितीच्या चौकशीत समोर आले आहे.
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६नुसार मुलीचे वय १८ आणि मुलाचे २१ वर्षे होणे आवश्यक आहे. दोघांपैकी एकाचेही वय पूर्ण झालेले नसेल तर लग्न बेकायदेशीर ठरते. त्यात दोन वर्षांची शिक्षा आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे. सध्या लग्नसराई असल्यामुळे पोलिस, बालविकास अधिकारी, बालकल्याण समिती दक्ष आहेत. बालविवाहाची माहिती मिळताच संबंधित ठिकाणी पोलिसांसह इतर विभागांचे अधिकारी जाऊन बालविवाह रोखतात. त्यानंतर संबंधितांना बालकल्याण समितीसमोर हजर करावे लागते. मागील १५ दिवसात बालकल्याण समितीसमोर बालविवाहाची ११ प्रकरणे आली. यातील सर्वच मुलींचे वय १८ वर्षांखालील होते, अशी माहिती बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. आशा शेरखाने - कटके यांनी दिली.
दोघांमध्ये १२ ते १५ वर्षांचे अंतर
रोखलेल्या बालविवाहात नवरा आणि नवरीत सरासरी १२ ते १५ वर्षे एवढे वयाचे अंतर होते. नवरीचे सरासरी वय १६ असून, होणारा पती हा ३० वर्षांचा असल्याचेही स्पष्ट झाले.
गरिबी हेच मुख्य कारण
१८ वर्षांच्या आत मुलीचा विवाह लावून जबाबदारीतून मुक्त होण्याची घाई आई - वडिलांना झालेली असते. त्यात गरिबी, मुलींची सुरक्षितता, पालकांचा अशिक्षितपणा ही विवाहाची मुख्य कारणे आहेत.
बालविवाहाची माहिती कळवा
बालविवाह राेखल्यानंतर वधू - वरांच्या आई - वडिलांना बालकल्याण समितीसमोर बोलवले जाते. त्यांना विश्वासात घेऊन बालविवाहाचे धोके सांगण्यात येतात. मुलीचा बालविवाह केल्यास तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तिचे सर्व प्रकारे शोषण होते. अल्पवयातच अपत्य होण्याच्या शक्यतेमुळे मुलीच्या जिवालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोठेही बालविवाह होत असेल तर समितीला कळवावे.
-ॲड. आशा शेरखाने-कटके, अध्यक्षा, बालकल्याण समिती