वकील दाम्पत्याची बनवाबनवी; एकच प्लॉट ६ जणांना विक्री करत सामान्यांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:57 IST2025-12-25T13:55:07+5:302025-12-25T13:57:14+5:30
या प्रकरणात सातारा व सिटी चौक पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

वकील दाम्पत्याची बनवाबनवी; एकच प्लॉट ६ जणांना विक्री करत सामान्यांची फसवणूक
छत्रपती संभाजीनगर : गारखेडा परिसरातील स्वप्ननगरी येथे राहणाऱ्या वकील दाम्पत्याने गंगापूर जहाँगीर येथील काही प्लॉट पाच ते सहा जणांना विकून फसवणूक केली. तसेच, एक प्लॉट दोघांना तर एका प्लॉटचे बनावट मुख्यत्यारपत्र करून दिले. या प्रकरणात सातारा व सिटी चौक पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
हर्षल भागचंद शिंदे, सायली हर्षल शिंदे असे वकील दाम्पत्याचे नाव आहे. यांच्या विरोधात प्रभारी दुय्यम निबंधक औदुंबर लाटे, जगदीश रोजेकर यांनी सातारा पोलिस ठाण्यात, तर दुय्यम निबंधक आबासाहेब तुपे यांनी सिटी चौक पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. सिटी चौकमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयातून मालमत्तेची खरेदी-विक्री करण्याच्या सुविधेचा फायदा घेत पेशाने वकील असलेल्या शिंदे दाम्पत्याने दोन वर्षांत सुमारे सात जणांना एकच प्लॉट विकून लाखो रुपयांना गंडविले. याबाबत आलेल्या एका तक्रारीनुसार गंगापूर जहॉंगीर गट नं.१४१ मधील साई निवारा येथील ९६९ चौ. फूट क्षेत्रफळ असलेला प्लॉट न.१५ अनेकांना व पार्ट बी मधील प्लॉट नं.१४ दोघांना विकल्यामुळे या प्रकरणाचे बिंग फुटले. सातारा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रामकृष्ण काळे, शैलेश देशमुख तपास करीत आहेत.
कामकाजावर परिणाम
बायपासवरील मुद्रांक नोंदणीच्या दोन्ही कार्यालयांतील दुय्यम निबंधकांना सातारा पोलिसांत ठाण्यात तक्रारीसाठी जावे लागल्यामुळे मुद्रांक नोंदणीवर परिणाम झाला. खरेदी-विक्रीसाठी आलेल्या अनेकांनी नाराजी दर्शवली.
असे फसविले अनेकांना
व्यवहार क्र. १
दुय्यम निबंधक क्र. ३ जगदीश रोजेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिंदे दाम्पत्याने प्लॉट नं. १४ दस्त नोंदणी क्र. ११३९१ / २०२४ नुसार २ लाख ८७ हजारांत करण गाणार (रा. चिकलठाणा) यांना व नंतर २ लाख ९० हजारांत शेखानी हबीब वली मोहम्मद (रा. बीड) यांना विकला.
व्यवहार क्र. २
दुय्यम निबंधक क्र. ६ औदुंबर लाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिंदे दाम्पत्याने प्लॉट नं. १५ दस्त नोंदणी क्र. ५६१८ / २०२५ नुसार ३ लाख ५० हजारांत स्वप्नाली पांडव (रा. नारळीबाग) यांना विकला.
व्यवहार क्र. ३
दुय्यम निबंधक लाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिंदे दाम्पत्याने प्लॉट नं. १५ दस्त नोंदणी क्रमांक ६८६८ / २०२५ नुसार ६ लाख ३० हजारांत संतोष सुकाशे रा. घोडेगाव यांना विकला.
व्यवहार क्र. ४
दुय्यम निबंधक लाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिंदे दाम्पत्याने प्लॉट नं. १५ दस्त नोंदणी क्रमांक १२०९३ / २०२५ नुसार ६ लाख ५० हजारांत शे.जुबेर शे.अब्दुल अजीज (रा. सिल्क मिल कॉलनी) यांना विकला.
व्यवहार क्र. ५
दुय्यम निबंधक लाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिंदे दाम्पत्याने दस्त नोंदणी क्रमांक १०५१३ / २०२५ नुसार दादासाहेब ठेंगल व इतर (रा. बीड) यांना मुखत्यारनामा व दस्त क्र.२०२४ पासून नोंदणीकृत असल्याचे भासवून बनावटरीत्या करून दिले. तसेच दोघांच्या स्वाक्षऱ्या करून कल्पना महाले (रा. सिडको महानगर १) यांच्या हक्कात जबाबाधारे शिंदे दाम्पत्याने गट नं.१४१ मधील प्लॉट क्र. सी ३३ विकला.
व्यवहार क्र. ६
नोंदणी कार्यालय क्र. ६ मध्ये दस्त नोंदणी क्र.१०८३६/२०२५ नुसार दुय्यम निबंधक कार्यालय ५ मधील दस्त क्र.४३४६/२०२४ हे नोंदणीकृत असल्याचे भासविले. दुय्यम निबंधकांचे बनावट शिक्के तयार करून कबुली जबाबासाठी शिंदे दाम्पत्याने गट नं. १४१ मधील प्लॉट क्र.सी ३३ चे बनावट मुख्यत्यारपत्र बनवले.