प्रदूषणातूनच समृद्ध होईल उद्याची भाषा...!

By Admin | Updated: February 3, 2015 01:00 IST2015-02-03T00:56:04+5:302015-02-03T01:00:43+5:30

वैविध्यपूर्ण भारतातील नामशेष होऊ पाहणाऱ्या जवळपास सातशे भाषांच्या सर्वेक्षणाचे बहुमोल काम भाषाभ्यासक-संशोधक डॉ. गणेश देवी यांनी पूर्णत्वाला नेले आहे.

The language of tomorrow will enrich with pollution ...! | प्रदूषणातूनच समृद्ध होईल उद्याची भाषा...!

प्रदूषणातूनच समृद्ध होईल उद्याची भाषा...!


वैविध्यपूर्ण भारतातील नामशेष होऊ पाहणाऱ्या जवळपास सातशे भाषांच्या सर्वेक्षणाचे बहुमोल काम भाषाभ्यासक-संशोधक डॉ. गणेश देवी यांनी पूर्णत्वाला नेले आहे. बोलींच्या अक्षरधनासह लोकसंस्कृतीचा भव्य पटच त्यातून उलगडला आहे. आजवर बहुतांशी दुर्लक्षित असलेल्या या क्षेत्रासह आदिवासी विकास, पुरातत्व संशोधन यातही महत्त्वाचे योगदान देणाऱ्या डॉ. देवी यांच्याशी ‘लोकमत’ ने साधलेला संवाद...
नव्या पिढीत सोशल मीडियामधून रूढ होऊ पाहणाऱ्या लघुरुपांमुळे मराठी कलुषित होते आहे का?
मला असे वाटत नाही. यातून भाषा बिघडणार नाही तर ती समृद्ध होईल. जी भाषा अधिकाधिक प्रदूषित होते तेवढा तिचा पैस वाढतो, ती सुदृढ होते. भाषा ही सांस्कृतिक संस्था आहे. त्यामुळे तिच्या शुद्धाशुद्धतेची चिंता बाळगण्याचे काही कारण नाही. दलित साहित्य सुरुवातीला समोर आले, तेव्हा त्या लेखनाची भाषा मराठीला हानी पोहोचवेल अशी वक्तव्ये केली गेली. मात्र, असे न होता या साहित्याने मराठीला अधिक संपन्न केले.
आदिवासी जनसमूहांसोबत तुम्ही बरेच मोठे काम केले आहे. आदिवासी अकादमीद्वारे त्यांच्यातील प्रतिभा शोधत तुम्ही ती जगासमोर आणली. याबाबत काही सांगा....
आदिवासींसाठी माझ्या मनात करुणा नाही, तर आदर आहे. आदिवासींबाबत मी नेहमी म्हणतो,‘दे नो दॅट दे बिलाँग टू द अर्थ; अँड नॉट द अर्थ बिलाँग्ज टू देम!’ आपल्यासारखे त्यांचे देव मानवनिर्मित नाहीत. निसर्गाला, पृथ्वीला ते देव मानतात. त्यामुळे जे काही काम त्यांच्यासाठी झाले आहे, ते त्यांनीच केले. मी केवळ साक्षीभावाने त्यांच्यासोबत होतो. तेच या प्रक्रियेत मला शिकवतात. त्यातून आदिवासी महिलांचे बचत गट, आरोग्य विमा, धान्य बँका, पाटबंधारे, अशी कामे उभी राहिली.
बाराशे गावांतील लोक स्वयंपूर्ण झाले. त्यातूनच भटके फोटोग्राफर ही कल्पना आकाराला येते आहे. कारण छायाचित्रकार हा भटक्या असतोच. त्यातच मुळात भटक्या असणाऱ्या या लोकांच्या हाती कॅमेरा दिला तर काय होईल? त्यांच्या नजरेतूनच त्यांचे विलक्षण जग अनुभवता येईल ना!
आज इंग्रजीच्या तडाख्यामुळे अनेक भाषा लोप पावत आहेत का? मग मराठी, कोकणी अशा प्रादेशिक भाषांचे भवितव्य काय?
इंग्रजी ही ‘लँग्वेज किलर’आहे. आॅस्टे्रलिया, न्यूझीलंड अशा अनेक देशांतील प्रादेशिक भाषा इंग्रजीच्या अतिक्रमणामुळे नष्ट झाल्या आहेत. मात्र, आपल्या देशात असे झाले नाही. कारण भारतीय माणूस हा जन्मत:च सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या बहुभाषिक आहे. दुसरे असे की, आपल्या अनुवादविषयक संवेदना जागृत आहेत. ज्ञानेश्वरी, तुळसीरामायण हे अनुवादच आहेत. आपण ते वर्षानुवर्षे परंपरेतून जपले आहेत. त्यामुळे भारतात तरी प्रादेशिक भाषांना धोका कमीच आहे.
आपण स्वत: मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी स्थापन केलेल्या समितीवर आहात. हा दर्जा मिळण्याबाबत आपली भूमिका काय आहे?
मराठी ही जोडणारी, प्राचीन भाषा आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळावा असा माझा आग्रह असून, केंद्र सरकारने तो दिला तर तो निश्चित नवनिर्मितीसाठी पोषक असेल. हा दर्जा देण्याची प्रक्रिया प्रत्येक भाषेसाठी वेगवेगळी आहे.
महाराष्ट्र राज्य भाषेबाबत सहिष्णु आहे. इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक जिवंत बोलीभाषा महाराष्ट्रात आहेत. त्यांची एकूण संख्या ५२ आहे. बोलीभाषा लुप्त होण्याचे प्रमाण मात्र, गुजरातमध्ये महाराष्ट्राहून अधिक आहे. केवळ मराठीची नव्हे तर या इतरही भाषांची आग्रही जोपासना व्हायला हवी.
४भाषा या अमर असतात. आज भाषाप्रेमींना व संस्कृती रक्षकांना अशी भीती वाटते की, नव्या सांस्कृतिक अतिक्रमणामुळे आपल्या भाषा नष्ट होत आहेत. पण टीव्ही व इंटरनेटच्या युगाचा आपल्या भाषांवर काहीच परिणाम होणार नाही.

Web Title: The language of tomorrow will enrich with pollution ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.