अतिवृष्टीमुळे जमीन रिचार्ज, टँकरचा खर्च वाचणार; भूजल पातळीत सव्वा मीटरने वाढ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 13:31 IST2025-11-04T13:31:54+5:302025-11-04T13:31:54+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी पडणाऱ्या एकूण पावसापेक्षा यंदा १३४ टक्के पाऊस पडला आहे.

अतिवृष्टीमुळे जमीन रिचार्ज, टँकरचा खर्च वाचणार; भूजल पातळीत सव्वा मीटरने वाढ !
छत्रपती संभाजीनगर : भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत सातत्याने भूजल पातळीची नोंद घेतली जाते. यंदा सतत अतिवृष्टीमुळे बहुतांश प्रकल्प, विहिरी, बोअरवेल आणि शेततळी पाण्याने भरलेली आहेत. जमिनीतही मोठ्या प्रमाणात पाणी मुरले आहे. यातून जिल्ह्याची भूजल पातळी सरासरी सव्वा मीटरने वाढली आहे. पुढील काळात पाण्याची चिंता मिटणार आहे.
यंदा सरासरीच्या १३४ टक्के पाऊस
जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अनेक मंडळांत अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात सरासरी पडणाऱ्या एकूण पावसापेक्षा यंदा १३४ टक्के पाऊस पडला आहे.
९५ टक्के साठा
आपल्या जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे लघू, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पात ९५ टक्क्यांहून अधिक जलसाठा आहे.
साडेचार फुटांनी वाढ 
यंदा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार आणि सततच्या पावसामुळे नदी, नाल्यांना अनेकदा पूर आले. शिवाय लहान, मोठी धरणे भरल्याने विहिरीही पाण्याने तुडुंब भरलेल्या आहेत. यातून भूजलपातळीत सुमारे १.२५ मीटरने वाढ झाली आहे.
तीन वर्षांतील भूजल पातळी
२०२३ --- १.५ मीटरने घट
२०२४ --- १ मीटर वाढ
२०२५ --- १.२५ मीटर वाढ
कशी केली जाते मोजणी?
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील १९७२ पासूनच्या विहिरींची पाणी पातळी मोजून त्या आधारे भूजलपातळीचा सरासरी अंदाज काढण्यात येतो.
टँकरचा खर्च वाचणार
यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील विहिरी आणि बोअरवेलला भरपूर पाणी आहे. अनेक विहिरींचे पाणी तर हाताने काढता येते. जलस्त्रोत बळकट झाल्याने यंदा टँकरचा खर्च वाचणार आहे.
टँकरची गरज भासणार नाही
जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाली. शिवाय सतत पाऊस पडल्याचा फायदा भूजल पातळी वाढण्यास झाला आहे. पातळीत वाढ झाल्याने रब्बी आणि उन्हाळी पिकांना याचा लाभ होईल. शिवाय ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावण्याची गरज भासणार नाही.
- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक
कोणत्या तालुक्यात किती पातळी? (तक्ता)
तालुका --- भूजल पातळीत वाढ मीटरमध्ये
छ.संभाजीनगर --- १.१३
गंगापूर--- १.१०
कन्नड-- १.३६
खुलताबाद-१.०९
पैठण--१.५५
फुलंब्री-१.६५
सिल्लोड--१.३१
सोयगाव-- १.०१
वैजापूर-- १.०७
भूजल पातळीत वाढ
यंदा पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त असल्याने निश्चितच भूजल पातळीमध्येही वाढ झालेली आहे. पुढील थोड्या कालावधीमध्ये अजून पाझर वाढून भूजल पातळीत वाढ दिसून येईल. याचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना होईल.
- जे. एस. बेडवाल, वरिष्ठ भूवैज्ञानिक तथा भूजल सर्वेक्षण यंत्रणा अधिकारी.