छत्रपती संभाजीनगर : बनावट कागदपत्रे, मूळ मालकाच्या खोट्या सह्या करून एकच जमीन एका वकिलासह खरेदी-विक्री व्यावसायिकाने परस्पर विकली; तर वरुडकाजीमधील मोक्याच्या कोट्यवधींच्या जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून दोघांनी परस्पर तिघांना विक्री करून जमिनीवर दावा ठोकला. गुरुवारी एकाच दिवसात महसूल व उपनिबंधक कार्यालयाशी संबंधित दोन कोट्यवधींच्या घोटाळ्याबाबत सातारा व सिटी चौक पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.
मूळ शेतकरी असलेले नंदू मुरलीधर मुळे (७४, रा. वरुडकाजी) यांची गट क्रमांक ४१ मध्ये ०.८३ आर जमीन होती. पैठण तालुक्यातील म्हाजोळा येथे जमीन खरेदी करायची असल्याने त्यांनी सदर जमीन विक्रीस काढली होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये सत्तार खान सरदार खान व नरेश बाळाराम कचकुरे यांच्यासोबत मुळे यांचा ९६ लाख ८० हजारांत जमिनीचा व्यवहार ठरला. सर्व रक्कम मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपनिबंधक कार्यालयात कुटुंबासमक्ष त्यांनी सत्तार खान व कचकुरे यांना खरेदीखत, सातबाऱ्यातही नाव नोंदवले गेले. याबाबत मुळे यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेल्या जाहीर प्रकटनावरही कोणी आक्षेप नोंदवला नव्हता.
सत्तार खान व नरेश कचकुरे यांनी १६ जानेवारी २०२५ रोजी सदर जमिनीची पुन्हा अनिल सानप, भारत काळे व एका डॉक्टरला खरेदीखताधारे विक्री केली. सातबारावर नाव लावण्यासाठी प्रयत्न केल्यावर मात्र सदर जमिनीबाबत आक्षेप आल्याचे समजले. नारायण बंडू खोसे (रा. मुकुंदवाडी), अरुण भगवान कोकाटे (एन-२) व विजय रंगनाथ पवार (रा. विजयनगर) यांनी मिळून तीच जमीन १ कोटी ३ लाखांत मुळे यांच्याकडून खरेदी करून त्यांना २० लाख रुपये इसाऱ्यापोटी दिल्याची खोटी कागदपत्रे सादर केली; शिवाय, १ सप्टेंबर २०२२ रोजी मुळे यांच्या खोट्या सह्या करून करारनामा सादर केला. मुळे यांनी या प्रकरणी सिटी चौक पोलिसांकडे अर्ज दिला होता. घोटाळ्याबाबत प्राथमिक पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी यात खोसे, पवार व कोकाटेंवर गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक भागवत मुठाळ अधिक तपास करत आहेत.
अशाच प्रकारे गंगापूर जहाँगीर परिसरातील एकच प्लॉट तीन वर्षांत दोघांना विकल्याचा घोटाळा समोर आला आहे. त्यात ॲड. हर्षल भागचंद शिंदे (४७, रा. शिवज्योती कॉलनी, एन-६) , सुधाकर विश्वनाथ ससाने (४७, रा. नवनाथनगर) यांच्यावर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एका माॅलमध्ये रोखपाल असलेल्या शेखर गरंडवाल (३४, रा. गारखेडा) यांनी सुधाकर ससाने यांच्या मध्यस्थीतून गंगापूर जहाँगीर येथील १३६३.९० चौ. मी. प्लॉट घेण्याचे ठरवले होते. भोजीराम लालू जाधव याच्या नावे सदर प्लॉटचा सातबारा, तर हर्षल शिंदे याच्या नावे मुखत्यारनामा होता. पाच लाखांत त्यांच्यात प्लॉट खरेदी करण्याचे ठरले. २१ एप्रिल २०२५ रोजी बीड बायपासवरील दुय्यम निबंधक कार्यालयात शेखर यांनी शिंदेला ५ लाख रुपये अदा केल्यानंतर खरेदीखत करून नगररचना कार्यालयाकडून लेआउटसाठी मंजुरी मिळवली. सातबारावर फेरनोंदीसाठी अर्ज केल्यावर मात्र दुय्यम निबंधक कार्यालयात हर्षल शिंदे यानेच ३ जानेवारी २०२३ रोजी त्याच जमिनीचा साक्षी महेश रत्नपारखी यांच्या नावे दस्तनोंदणी केल्याचे उघड झाले. या प्रकरणी उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे तपास करत आहेत.
Web Summary : Chhatrapati Sambhajinagar faces land scams involving forged documents and signatures. Two cases, totaling crores, involve illegal land sales and fraudulent claims, leading to police investigations.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में जाली दस्तावेजों और हस्ताक्षरों से भूमि घोटाले। करोड़ों के दो मामलों में अवैध भूमि बिक्री और धोखाधड़ी के दावे शामिल हैं, जिससे पुलिस जांच हो रही है।