... म्हणे मित्राच्या मदतीच्या उपकारार्थ त्याच्या मुलाला जमीन दान; सालारजंगच्या वंशजाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 19:48 IST2025-07-12T19:47:41+5:302025-07-12T19:48:03+5:30
तीन दिवस मूळ जमीनधारकाची कसून चौकशी

... म्हणे मित्राच्या मदतीच्या उपकारार्थ त्याच्या मुलाला जमीन दान; सालारजंगच्या वंशजाचा दावा
छत्रपती संभाजीनगर : खा. संदीपान भुमरे, आ. विलास भुमरे यांचा चालक माझ्या मित्राचा मुलगा आहे. मित्राने मला केलेल्या मदतीच्या उपकारार्थ मी त्याला काल्डा कॉर्नर येथील जमीन दान दिली, असा अजब दावा हैदराबादस्थित सालारजंग वंशज मीर महेमूद अली खान यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत केला आहे. पोलिसांनी त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची तीन दिवस कसून चौकशी केली. त्यात त्याने हिब्बानामासह अन्य कागदपत्रे देखील सादर केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
परभणीस्थित ॲड. मुजाहिद इकबाल खान समीरउल्ला खान यांनी याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, सालारजंगचे वंशज मीर महेमूद अली खान यांनी त्यांना सदर जमिनीच्या पीआर कार्डवर नाव लावण्याच्या कायदेशीर लढाईसाठी नियुक्त केले होते. केस लढल्याच्या बदल्यात महेमूद यांनी फीसच्या मोबदल्यात सदर जमिनीचे ॲग्रीमेंट टू सेल, रजिस्टर्ड जीपीए व हिब्बानामा करून दिला होता. त्यासाठी मुजाहिद यांनी मीर महेमूद अली यांना रोख, बँकेद्वारे ९० लाख ते १ कोटी रु. दिले. मात्र, तरीही भुमरे यांच्याकडून मोठी रक्कम मिळाल्याने त्यांचे चालक जावेद रसूल शेख याच्या नावे त्याच जमिनीचा बनावट हिब्बानामा करून दिल्याचा आरोप तक्रारीत आहे.
चालक अनुपस्थितच, वंशजांची तीन दिवस चौकशी
दरम्यान, चालक जावेद एकदा पोलिस आयुक्तालयात चौकशीसाठी हजर झाला. त्यानंतर त्याने प्रकृतीचे कारण देत पोलिसांच्या नोटिसीला महत्त्वच दिले नाही. तर सालारजंग वंशज मीर महेमूद अली खान यांची बुधवारपासून आर्थिक गुन्हे शाखेने कसून चौकशी केली. गुरुवार, शुक्रवार त्यांच्या मुला, मुलींना प्रश्न विचारण्यात आले. मात्र, सर्व कुटुंब जमीन दान दिल्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. प्राथमिक स्तरावर त्यांची चौकशी पूर्ण झाल्याने सद्य स्थितीत त्यांना पुन्हा बोलावण्यात आले नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पोलिस आता चालक जावेद बाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.