लड्डा दरोडा: सूत्रधारांच्या चौकशीचा पोलिसांचा अधिकार संपला, सोन्याचे गूढ गुलदस्त्यातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:43 IST2025-06-11T11:42:33+5:302025-06-11T11:43:22+5:30

दरोड्यातील एकूण १७ आरोपी हर्सूल कारागृहात रवाना करण्यात आले आहेत.

Ladda robbery: Police's right to question the ringleaders has ended, the mystery of the gold remains in the bouquet | लड्डा दरोडा: सूत्रधारांच्या चौकशीचा पोलिसांचा अधिकार संपला, सोन्याचे गूढ गुलदस्त्यातच

लड्डा दरोडा: सूत्रधारांच्या चौकशीचा पोलिसांचा अधिकार संपला, सोन्याचे गूढ गुलदस्त्यातच

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या दरोड्याच्या सूत्रधारांच्या चौकशीचा पोलिसांचा अधिकार आता संपला आहे. दरोडा टाकणाऱ्या ५ जणांच्या पोलिस कोठडीची १४ दिवसांची मुदत संपल्याने मंगळवारी हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. भविष्यात दुसऱ्या गुन्ह्यात त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाऊ शकते. मात्र, ती शक्यता देखील धूसर आहे. दरोड्यातील एकूण १७ आरोपी हर्सूल कारागृहात रवाना करण्यात आले आहेत. अंबेजोगाईचा दरोडेखोर सुरेश गंगणेचा मित्र सूर्यकांत मुळे हा पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्या आणखी एका मित्राला मंगळवारी उशिरा पुण्यातून ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

१५ मे रोजी लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याने संपूर्ण शहराला हादरवले. यात २६ मे रोजी दरोड्याचा मास्टरमाईंड अमोल खोतकर याच्या एन्काउंटरने दरोड्याला आश्चर्यकारक वळण मिळाले. एन्काउंटरचा सीआयडी तपास करत असून आतापर्यंत ७ पेक्षा अधिक अधिकाऱ्यांसह महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. दरोड्याचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेला आत्तापर्यंत ६० तोळे सोने व ३० किलो चांदीचा शोध लावण्यात यश मिळाले. यातील उर्वरित सोन्याचा सुगावा पोलिसांना लागला आहे. मात्र, त्याबाबत सबळ पुरावे नसल्याने वाच्यता केली जात नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.

नियोजनापासून - विक्रीपर्यंतचा छडा लागला
दरोड्यासाठी टीप देण्यापासून दरोड्यातील सोने खरेदी करण्यापर्यंत एकूण १८ जणांना आत्तापर्यंत यात अटक करण्यात आली. यातील मुळे वगळता मंगळवारपर्यंत १७ जणांची हर्सूल कारागृहात रवानगी झाली.

मुळेच्या नावावर कारची खरेदी
गंगणेने १५ मे रोजी दरोडा टाकल्यानंतर १८ मे रोजी पुण्यातील अकिल नावाच्या डीलरकडून ६.५ लाखांत गाडी खरेदी केली होती. यासाठी त्याला सोहेलने पैसे देऊन सोने विकल्यानंतर ते परत करण्याचा करार ठरला होता. पोलिसांनी ही मारुती ब्रीझा कार मंगळवारी जप्त केली.

त्या मित्राची चौकशी
गंगणे, मुळेच्या आणखी एका अवसेकर नावाच्या मित्राला पुण्यातून गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. दरोड्यानंतर तिरुपती दर्शनासाठी गेलेल्या गंगणे, अमोल व इतरांसोबत अवसेकरही होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत त्याची कसून चौकशी सुरू होती.

Web Title: Ladda robbery: Police's right to question the ringleaders has ended, the mystery of the gold remains in the bouquet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.