लड्डा दरोडा प्रकरण: दरोडेखोरांनी लुटलेले सोने वितळवून विकले, नांदेडमध्ये छापे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 11:53 IST2025-06-05T11:53:13+5:302025-06-05T11:53:43+5:30
गुन्हे शाखेच्या एका पथकाने बुधवारी नांदेडमध्ये छापा टाकत सराफा मार्केटमधून बाकलीवाल ट्रेडर्सच्या मालकाला ताब्यात घेतले.

लड्डा दरोडा प्रकरण: दरोडेखोरांनी लुटलेले सोने वितळवून विकले, नांदेडमध्ये छापे
छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरमधील उद्याेजक लड्डा यांच्या घरातून लुटलेल्या सोन्याचे बहुतांश दागिने दरोडेखोरांनी वितळवून सराफांना विकले. गुन्हे शाखेच्या एका पथकाने बुधवारी नांदेडमध्ये छापा टाकत सराफा मार्केटमधून बाकलीवाल ट्रेडर्सच्या मालकाला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून आरोपी सुरेश गंगणे व त्याच्यात किती सोन्याचा व्यवहार झाला, हे स्पष्ट होईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जवळपास २० ते ३० लाखांमध्ये व्यवहार झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
खरेच ५.५ किलो सोने चोरीला गेले का, हा पोलिसांचा संभ्रम कायम आहे. दरोड्यातील बहुतांश सोने अमोल खोतकर व सुरेश रामकिसन गंगणे (रा. अंबाजोगाई) यांच्याकडेच असल्याची माहिती अन्य दरोडेखोर देत आहेत. मात्र, तरीही पोलिसांनी प्रत्येक आरोपीची स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. त्यांचे जबाब पडताळून पाहिले जात आहेत.
कोणाकडे किती ?
अमोलच्या एन्काउंटरमुळे अद्यापही बाकीचे सोने कुठे आहे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. बहुतांश सोने गंगणेकडूनच हस्तगत होत आहे. अमोलच्या जवळील व्यक्तींची चौकशी अद्याप बाकी असल्याने त्याच्याकडील सोने मिळालेले नाही. मात्र, चांदीचे दागिने अमोलच घेऊन गेल्याचे त्याचे साथीदार सांगतात. मुख्य सूत्रधार याेगेश हाजबे (रा. वडगाव कोल्हाटी) याचेही सोने अमोलनेच घेतल्याची माहिती दिल्याने अधिक संभ्रम निर्माण झाला आहे. गंगणेचा साथीदार सोहेल जलील शेख अशा दोघांचे सोने गंगणेने बाकलीवालला विकल्याचा अंदाज आहे. बाकलीवालच्या चौकशीनंतर त्याबाबत नेमकी माहिती मिळेल, असे निरीक्षक संभाजी पवार यांनी स्पष्ट केले. कुख्यात, मुरलेले दरोडेखोर सबळ पुरावे लुटलेले सोने पुरावे वितळवून विकतात. गंगणेने देखील तीच पद्धत वापरल्याचे पोलिसांनी सांगितले.
अमोलकडे दोन पिस्तूल
हजबेच्या घरझडतीत दरोड्यात लड्डा यांचा चालक संजय झळके यांच्या डोक्याला लावलेले पिस्तूल पोलिसांनी जप्त केले. अमोलकडे दोन पिस्तुले होती. त्यापैकी एक त्याने हाजबेकडे दिले, तर दुसरे त्याने एन्काउंटरदरम्यान पोलिसांवर हल्ल्यासाठी वापरलेले होते. ही दोन्ही पिस्तुले पोलिसांनी जप्त केली.