एन्काउंटर होण्याच्या काही तांस आधीच खोतकर बहीण-भावाची सोन्याच्या पैशातून जमीन खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 18:44 IST2025-06-28T18:43:42+5:302025-06-28T18:44:59+5:30

लग्न ठरलेल्या दिवशीच रोहिणी खोतकरची हर्सूल कारागृहात रवानगी, गोव्यातून मित्र ताब्यात

Ladda Robbery case: Hours before the encounter, brother Amol Khotkar and sister Rohini Khotkar bought land in Padegaon by money selling gold | एन्काउंटर होण्याच्या काही तांस आधीच खोतकर बहीण-भावाची सोन्याच्या पैशातून जमीन खरेदी

एन्काउंटर होण्याच्या काही तांस आधीच खोतकर बहीण-भावाची सोन्याच्या पैशातून जमीन खरेदी

छत्रपती संभाजीनगर : उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यातील दरोडा प्रकरणात मुख्य आरोपी तथा एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरने सोने विकून पडेगावमध्ये ९ लाखात जमीन खरेदी केली होती. २६ मे रोजी एन्काउंटर होण्याच्या दिवशीच हा व्यवहार केला. जमीन बहीण रोहिणी खोतकरच्या नावे केली. रोहिणीच्या पोलिस कोठडीदरम्यान या व्यवहारातील ९ लाख रुपये जप्त केले असल्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.

लड्डा विदेशात असताना १५ मे रोजी त्यांच्या घरी दरोडा पडला. यात ५.५ किलो सोने, ३२ किलो चांदी लुटण्यात आली. गुन्हे शाखेने आतापर्यंत २१ आरोपींना अटक केली. दरोड्याचा मुख्य सूत्रधार अमोल २६ मे रोजी साजापूर शिवारात सहायक निरीक्षक रविकांत गच्चे यांच्यासोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. दरोड्यापासून ते एन्काउंटरपर्यंत अमोल मैत्रिण खुशीच्या सोबतच होता. सोने विकलेले ठिकाण, पैशांचा व्यवहार, लपवलेल्या चांदीपासून ते खरेदी केलेल्या जमिनीबाबत प्रत्येक गोष्ट तिला माहीत होती. त्यामुळे खुशीच्या सखोल चौकशीतून हा घटनाक्रम उलगडत गेला. अमोल, रोहिणीने पडेगावमध्ये रेल्वे रुळाजवळ प्लॉटचा ९ लाखांत व्यवहार ठरवला होता. २६ मे रोजी दुपारी अमाेलच्या उपस्थितीत प्लॉट मालकाला ९ लाख रुपये देऊन कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली. त्यावेळी खुशीदेखील उपस्थित होती. यात रोहिणीची भूमिका ही गुन्ह्याला पाठिंबा दिल्याचे सिध्द झाल्याने २४ जून रोजी तिला अटक करण्यात आली.

लग्नाच्या तारखेला कारागृहात
चौकशी सुरू असतानाच रोहिणी १८ जून रोजी मोबाइल बंद करून गोव्याला मित्र रणजीतला भेटण्यासाठी गेली. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला होता. २३ जून रोजी परत येऊन तिने प्लॉट खरेदी रद्द करत मालकाला पैसे परत मागितले होते. तोपर्यंत पोलिसांनी तिला अटक केली. मूळ बंगळुरूचा असलेला रणजीत गोव्यात कॅसिनोमध्ये नोकरी करतो. ऑक्टोबर २०२४मध्ये राेहिणीची त्याच्याशी गाेव्यात ओळख झाली होती. तिने त्याच्यासोबत लग्न करण्याचेही ठरवले होते. २६ जून रोजी लग्नाची तारीख ठरली होती. मात्र, त्याच दिवशी तिची हर्सूल कारागृहात रवानगी झाली. आवश्यकता वाटल्यास तिच्या उर्वरित पोलिस कोठडीचा हक्क राखीव ठेवत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याची मागणी शुक्रवारी पोलिसांनी केली.

मित्राची कसून चौकशी
गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी गोव्यातून रोहिणीचा मित्र रणजीतला ताब्यात घेतले. शुक्रवारी त्याची दोन पथकांनी कसून चौकशी केली. रोहिणीने त्याला अनेक गोपनीय माहिती सांगितल्याचा दाट संशय पोलिसांना आहे.

Web Title: Ladda Robbery case: Hours before the encounter, brother Amol Khotkar and sister Rohini Khotkar bought land in Padegaon by money selling gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.