दागिन्यांसाठी ८ वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; भिक्षेकरी महिलांच्या वेषातील टोळीचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 17:15 IST2026-02-16T17:12:35+5:302026-02-16T17:15:02+5:30
भविष्य सांगणाऱ्या भोंदूबाबांच्या रॅकेटपाठोपाठ दुसरी घटना; भिक्षेकरी महिलांच्या वेषातील टोळीचा पर्दाफाश. मूर्तिजापूरमध्ये जमावाकडून मारहाणीचा प्रयत्न

दागिन्यांसाठी ८ वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; भिक्षेकरी महिलांच्या वेषातील टोळीचा पर्दाफाश
छत्रपती संभाजीनगर : भविष्य सांगण्याच्या बहाण्याने भोंदूबाबांनी नागरिकांना मृत्यूची भीती दाखवून नागरिकांना लुटले. ही घटना ताजी असतानाच आता महिलांच्या टोळ्या खेळणाऱ्या लहान मुलांना हेरून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटण्यासाठी पीठ, अन्न मागत फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संतप्त जमावाने महिलांना पकडल्यानंतर स्थानिक पदाधिकारी, पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने भिक्षेकरी महिलांना मारहाण टळली. रविवारी सायंकाळी धूत रुग्णालयासमोरील मूर्तिजापूरमध्ये या घटनेनंतर मुलांना पळवणारी टोळी आल्याच्या चर्चेने पालक भयभीत झाले.
एन-६ मधील एक महिला रविवारी दुपारी मूर्तिजापूरमधील मावशीला भेटायला गेली. सायंकाळी ४.३० वाजता त्यांची ८ वर्षाची मुलगी परिसरात खेळत असताना अचानक एका भिक्षेकरी महिलेने तिचा हात पकडून निर्मनुष्य परिसरात नेण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलीने महिलेच्या हाताला झटका देऊन रडतच घराकडे पळ काढला. कुटुंबाला ही बाब समजताच रहिवासी जमा झाले. तेवढ्यात भिक्षेकरी महिलांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी पाठलाग करून त्यांना पकडले.
मुलीला पकडल्याची टोळीची कबुली
स्थानिकांनी महिलांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून मारहाणीचा प्रयत्न केला. घटनेची माहिती कळताच नगरसेवक मनोज गांगवे, स्थानिक पदाधिकारी दीपक खोतकर यांनी जमावाला शांत करून पोलिसांना बोलावले. एमआयडीसी सिडको पोलिसांनी धाव घेत भिक्षेकरी महिलांना ठाण्यात नेले. ठाण्यात भिक्षेकरी महिलेने मुलीला नेत असल्याची कबुली दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
साबुदाणा खिचडीचा बहाणा
स्थानिकांच्या माहितीनुसार, पकडलेल्या महिलांची टोळी काही दिवसांपासून बीड बायपास परिसरात झोपडी टाकून राहते. रविवारी दुपारपासून त्या परिसरात घरोघरी जेवण, पीठ मागत फिरत सोन्याचे दागिने परिधान केलेली लहान मुले हेरत होत्या. एका लहान मुलीला मंदिरात साबुदाणा खिचडीचे वाटप सुरू असल्याचे सांगून त्यांनी सोबत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या महिला साथीदार पकडल्या गेल्याचे समजताच त्यांनी परस्पर पळ काढला. ८ वर्षांच्या मुलीच्या आईच्या तक्रारीवरून रात्री उशिरापर्यंत कारवाईची प्रक्रिया सुरू होती.