Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर हादरले; "कानून हमारे हात में है!" म्हणत गुंडांकडून माजी सरपंचाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:54 IST2025-12-18T12:53:30+5:302025-12-18T12:54:22+5:30
Chhatrapati Sambhajinagar Sarpanch Murder: कुटुंबातील महिला हात जोडून विनवण्या करत राहिल्या; क्रूर गावगुंड डोक्यात घाव घालत राहिले

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर हादरले; "कानून हमारे हात में है!" म्हणत गुंडांकडून माजी सरपंचाची हत्या
छत्रपती संभाजीनगर: गावातीलच जमिनीवरील ताब्यावरून अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादातून अकरा जणांच्या गावगुंडांच्या टोळीने जटवाडा रस्त्यावरील ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांडू पठाण (६८) यांची बुधवारी दुपारी क्रूरपणे हत्या केली. एकीकडे पठाण यांच्या कुटुंबातील महिला हल्लेखोरांना हात जोडून वाद मिटवण्यासाठी विनवण्या करत होत्या. तेव्हा डोक्यात गुंडगिरी भिनलेली क्रूर टोळी मात्र लाठ्याकाठ्या, लाथांनी पठाण यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर घाव घालत होती. दादा पठाण यांचा मृत्यू झाला. रात्री एकास अटक झाली. बाकीचे हल्लेखोर पसार आहेत.
इम्रान खान मोईन खान पठाण, जमीर इनायत खान पठाण, मोसीन मोईन खान पठाण, अफरोज खान गयाज खान, अस्लम गयाज पठाण ऊर्फ गुड्डू, समीर जमीर पठाण, उमेर जमीर पठाण, फुरकान अजगर पठाण, इम्रान मोईन पठाण, रामअवतार सागरमल साबू, हैदर गयाज पठाण, मोसीन मोईन पठाण, अशी हल्लेखोरांची नावे आहेत. पठाण यांचे कुटुंब मूळ ओव्हरगावचेच असून, घरासमाेरच त्यांची शेती आहे. काही अंतरावर शाळेजवळ त्यांची जमीन आहे. या जमिनीच्या शेजारून एक वाट जाते. सुरुवातीला आरोपींच्या टोळीने या छोट्या वाटेवरून वाद घालण्यास सुरुवात केली. कालांतराने पूर्ण जमिनीवरच दावा करण्यास सुरुवात केली. यातून त्यांच्यात अनेकदा वाद झाले. बुधवारी दुपारी पठाण यांनी जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी जेसीबी बोलावला. दहा ते अकरा जणांच्या टोळीने तेथे धाव घेतली. खुर्चीवर बसलेल्या पठाण यांच्यावर लाठ्याकाठ्या, रॉडने हल्ला केला. वृद्ध दादा पठाण जागीच मरण पावले.
‘कानून हमारें हात में है’ म्हणत घरावर धावून गेले
आरोपी इम्रान खान व अफरोज यांचे दादा पठाण यांच्या घरासमोरच फरसाणचे दुकान आहे. सुरुवातीला त्यांनी दादांची मुले अफसर व जुबेर यांच्यावर हल्ला चढवला. त्यांच्या पत्नींनी दोघांना आत नेत कंपाऊंडच्या गेटला कुलूप लावले. ‘वाद घालू नका, आपण चर्चेतून प्रश्न सोडवू’, अशा विनवण्या त्या करत होत्या. तरीही हल्लेखोर कुलूप तोडून घरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. शिवीगाळ करून धमक्या देत होते. ‘कानून हमारें हात में है’ असे म्हणत त्यांनी एकट्या दादा पठाण यांना लक्ष्य केले. शिवाय, स्वत:वर हल्ला झाल्याचा बनाव करण्यासाठी स्वत:च्याच दुकानाची तोडफोड केली.
एक ताब्यात, अन्य कुटुंबासह पसार
घटनेची माहिती कळताच सहायक पोलिस आयुक्त मनोज पगारे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, हर्सूलच्या पोलिस निरीक्षक स्वाती केदार, सहायक पोलिस निरीक्षक सचिन सदाफुले, उपनिरीक्षक गणेश केदार, प्रवीण वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा आरोपी इम्रान खानला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर अन्य हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांनी सांगितले.
यापूर्वीही गंभीर गुन्हे
एप्रिल २०२३ मध्ये ओव्हरगावात दोन गटांत तुफान दगडफेक होत दंगल उसळली होती. दादा पठाण यांची हत्या करणाऱ्या ११ जणांमधील काहींचा त्या दंगलीत सहभाग होता. त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले. त्याशिवाय, फुरकानवर देखील ‘पोक्सो’सारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. दादा पठाण यांच्या तक्रारीवरूनही हल्लेखोरांवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. मात्र, त्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही.