कन्नड नगरपरिषदेचे व्यापारी संकुल कोसळले; इशाऱ्याकडे दुर्लक्षाने व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 16:26 IST2025-07-03T16:23:57+5:302025-07-03T16:26:03+5:30

या दुर्घटनेत आठ गाळे पूर्णपणे जमीनदोस्त झाले असून, सुमारे २० गाळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Kannada Municipal Council's commercial complex collapses; Traders lose lakhs due to ignoring warnings | कन्नड नगरपरिषदेचे व्यापारी संकुल कोसळले; इशाऱ्याकडे दुर्लक्षाने व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान

कन्नड नगरपरिषदेचे व्यापारी संकुल कोसळले; इशाऱ्याकडे दुर्लक्षाने व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान

कन्नड (छत्रपती संभाजीनगर) : शहरातील तहसील कार्यालयासमोर असलेली कन्नड नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलाचा काही भाग गुरुवारी दुपारी सुमारे २.३० वाजता अचानक कोसळला. या दुर्घटनेत आठ गाळे पूर्णपणे जमीनदोस्त झाले असून, सुमारे २० गाळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत.

व्यापारी संकुलाची ही इमारत दोन टप्प्यांत बांधण्यात आली होती. पहिला टप्पा म्हणजे खालचा भाग हा १९८०-८१ साली २० गाळ्यांचे बांधकाम झाले होते, तर दुसऱ्या टप्प्यात २००४-०५ साली वरच्या आठ गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. यातील वरचे आठ गाळे कोसळून पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, या इमारतीच्या असुरक्षित स्थितीबाबत मे २०२५ मध्ये तत्कालीन मुख्याधिकारी तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी व्यापाऱ्यांना इमारत खाली करण्याचे लेखी आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा १५ जून रोजी मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांनीही पुन्हा लेखी सूचना दिल्या होत्या. मात्र व्यापाऱ्यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना घडल्याचे भालेराव यांनी सांगितले. घटनेनंतर इमारतीचा मलबा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नगरपरिषदेचे प्रशांत देशपांडे, राजेंद्र सोनार, रमेश थोरात यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक नासेर पठाण आणि कर्मचारी वर्ग घटनास्थळी कार्यरत आहेत.

Web Title: Kannada Municipal Council's commercial complex collapses; Traders lose lakhs due to ignoring warnings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.