‘जनशताब्दी’ १५ मिनिट आधी सुटणार; छ.संभाजीनगरमार्गे धावणाऱ्या ४ रेल्वेंच्या वेळेत बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 19:26 IST2025-01-02T19:21:24+5:302025-01-02T19:26:31+5:30
हिंगोली-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस ही छत्रपती संभाजीनगरला सकाळी ९:४५ वाजता येत होती आणि ९:५० वाजता मुंबईसाठी रवाना होत होती, या वेळापत्रकात आता बदल करण्यात आला आहे

‘जनशताब्दी’ १५ मिनिट आधी सुटणार; छ.संभाजीनगरमार्गे धावणाऱ्या ४ रेल्वेंच्या वेळेत बदल
छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मध्य रेल्वेतर्फे १ जानेवारीपासून नवीन वेळापत्रक लागू करण्यात येत आहे. त्यात २२ रेल्वेंच्या वेळेत बदल करण्यात आला असून, त्यात छत्रपती संभाजीनगरमार्गे धावणाऱ्या ४ रेल्वेंचा समावेश आहे. नव्या वेळापत्रकानुसार हिंगोली-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस आता पूर्वीच्या वेळेच्या तुलनेत १५ मिनिट आधी सुटणार आहे.
हिंगोली-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस ही छत्रपती संभाजीनगरला सकाळी ९:४५ वाजता येत होती आणि ९:५० वाजता मुंबईसाठी रवाना होत होती. नव्या वेळेनुसार ही रेल्वे आता छत्रपती संभाजीनगरला सकाळी ९:३० वाजता येईल. पाच मिनिटांच्या थांब्यानंतर ९:३५ वाजता रवाना होईल. याबरोबरच तिरुपती- छत्रपती संभाजीनगर एक्स्प्रेस ही आता रात्री ८:२५ वाजेऐवजी रात्री १०:४० वाजता येईल. तर छत्रपती संभाजीनगर- नांदेड एक्स्प्रेस रात्री १:०५ वाजेऐवजी रात्री ११:३० वाजता सुटेल तसेच नगरसोल - काचिगुडा एक्स्प्रेस सकाळी ६:५५ वाजेऐवजी सकाळी ७:१५ वाजता येईल आणि पाच मिनिटांच्या थांब्यानंतर पुढे रवाना होईल.