"मर्डर करून आलोय, उभ्याने चिरीन!"; तडीपार गुंडाची पोलिसांनाच धमकी, नातेवाईकांचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 17:31 IST2026-02-27T17:31:00+5:302026-02-27T17:31:26+5:30

तडीपार गुंडाला पकडण्यास गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला; सातजणांच्या विरोधात गुन्हा दाखल

"I've come to commit murder, I'll scream!"; Tadipar gangster threatens police, attacked by relatives | "मर्डर करून आलोय, उभ्याने चिरीन!"; तडीपार गुंडाची पोलिसांनाच धमकी, नातेवाईकांचा हल्ला

"मर्डर करून आलोय, उभ्याने चिरीन!"; तडीपार गुंडाची पोलिसांनाच धमकी, नातेवाईकांचा हल्ला

छत्रपती संभाजीनगर : तडीपार सराईत गुंड शहरात आल्याची माहिती छावणी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यास पकडण्यासाठी पथक पोहोचले. तेव्हा पथकावर तडीपार गुंडासह नातेवाइकांनी प्राणघातक हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि.२५) रात्री साडेसातच्या सुमारास भावसिंगपुरा येथील आमेन चौकात घडली. या हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी जखमी असून, एकाच्या हाताला आरोपीने जोराचा चावा घेत जखमी केले.

आरोपींमध्ये ईश्वर राजू चव्हाण (हद्दपार गुंड), सचिन त्रिभुवन, विकास भालेराव, शकुंतला चव्हाण, अंजली चव्हाण, शिला त्रिभुवन, पायल त्रिभुवन (सर्व रा. भीमनगर, भावसिंगपुरा) या सातजणांचा समावेश आहे. छावणी ठाण्यातील पोलिस हवालदार याप्रकरणी हवालदार महाशंख दांडगे यांच्या तक्रारीनुसार, छावणी पोलिसांचे विशेष पथक हद्दीत गस्त घालत असताना तडीपार गुंड ईश्वर चव्हाण हा आमेन चौक, भावसिंगपुरा येथे उभा असल्याची माहिती मिळाली. त्यावरून दांडगे, उपनिरीक्षक हाके आणि पथक घटनास्थळी पोहोचले. तिथे ईश्वर चव्हाण आढळून आला.

पोलिसांनी त्याला हद्दीत येण्याची परवानगी विचारली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्याचे नातेवाईक सचिन त्रिभुवन, विकास भालेराव, शकुंतला चव्हाण, अंजली चव्हाण, शिला त्रिभुवन आणि पायल त्रिभुवन (सर्व रा. आमेन चौक, भीमनगर) तिथे जमा झाले. त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत, शिवीगाळ करून पोलिसांच्या गाडीची चावी काढून घेतली.

पोलिसाला चावा घेत कपडे फाडले
आराेपी जमावाने पोलिसांना घेरल्याने जादा कुमक मागवण्यात आली. यानंतर आरोपी ईश्वर चव्हाण आणि सचिन त्रिभुवन यांनी पो. काँ. खान यांना मारहाण करून त्यांचे कपडे फाडले. तसेच, चव्हाणने अंमलदार सूर्यवंशी यांच्या डाव्या हाताला जोरात चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तुम्हा सर्वांना उभ्याने चिरतो
पोलिस गाडीत बसवत असताना ईश्वर चव्हाणने, मी आत्ताच मर्डर केसमधून बाहेर आलो आहे, तुम्हा सर्व पोलिसांना उभ्याने चिरून टाकतो, अशी धमकी दिली. त्याने आपल्याजवळील लोखंडी सुरा काढून फिर्यादी दांडगे यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दांडगे यांनी तो चुकवला. त्याचवेळी आरोपी सचिन त्रिभुवनने दांडगे यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर स्वतःच्याच डोक्यात दगड मारून घेत पोलिसांवर खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला.

चार आरोपींना पोलिस कोठडी
या प्रकरणात छावणी पोलिसांनी ईश्वर चव्हाण, अंजली चव्हाण, शिला त्रिभुवन, पायल त्रिभुवन यांना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, २८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक काकासाहेब नागवे करीत आहेत.

पाच दिवसांत पोलिसांवर तिसरा हल्ला
मागील पाच दिवसांत पोलिसांवर झालेला हा तिसरा हल्ला आहे. हायकोर्ट सिग्नलवर पती-पत्नीने वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करीत मारहाण केली होती. त्याच दिवशी सिडको ठाण्यातील पाेलिसाला रिक्षाचालकाने मारहाण करून खाकी वर्दी फाडली. त्यानंतर भिवसिंगपुरा भागात तर पोलिसांच्या पथकावरच गुंडासह नातेवाइकांनी प्राणघातक हल्ला केला. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडालेली आहे.

Web Title : तड़ीपार गुंडे की पुलिस को धमकी, परिवार का हमला; छत्रपति संभाजीनगर में गिरफ्तारियां

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में एक वांछित गुंडे और उसके परिवार ने पुलिस पर हमला किया। गुंडे ने अधिकारियों को जान से मारने की धमकी दी। कई गिरफ्तारियां हुईं। पांच दिनों में पुलिस पर यह तीसरा हमला है, जिससे चिंता बढ़ गई है।

Web Title : Outlawed Goon Threatens Police, Family Attacks; Arrests Made in Chhatrapati Sambhajinagar

Web Summary : A wanted goon and his family attacked police in Chhatrapati Sambhajinagar. The goon threatened to kill officers. Several arrests were made. This marks the third attack on police in five days, raising concerns.