छ. संभाजीनगरातील आकाशवाणी चौक खुला करण्याचा डाव निवडणुकीपुरताच? आता मागवल्या हरकती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 19:17 IST2026-01-22T19:15:57+5:302026-01-22T19:17:05+5:30
९ जानेवारी रोजी पोलिसांनी बॅरिकेट्स काढून चौक खुला केला. चौकात कार्यकर्त्यांच्या जल्लोषात पालकमंत्री सहभागी झाले.

छ. संभाजीनगरातील आकाशवाणी चौक खुला करण्याचा डाव निवडणुकीपुरताच? आता मागवल्या हरकती
छत्रपती संभाजीनगर : ऐन महानगरपालिका निवडणुकीदरम्यान पोलिसांनी अचानक बॅरिकेट काढून आकाशवाणी चौक वाहतुकीसाठी खुला केला. या निर्णयाला राजकीय दबावाची किनार होती. निवडणूक आयोगाने याची दखल घेत खुलासा मागवला होता. आता पुन्हा पोलिसांनी सदर चौक बंद करण्याची हालचाल सुरू केली असून, जाहीर प्रगटनाद्वारे त्याबाबत रीतसर आक्षेप, हरकती, सूचना मागवल्या आहेत.
जालना रोडवरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. २०१६ मध्ये सकाळी व सायंकाळी प्रत्येकी तीन तासांसाठी आकाशवाणी व अमरप्रीत चौक बंद करून वाहतूक सरळ सुरू ठेवण्याचा प्रयोग राबवला होता. त्यानंतर दोन्ही चौक सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ऐन मनपा निवडणुकीत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पोलिस आयुक्तांना चौक खुला करण्याबाबत पत्र पाठवले. ९ जानेवारी रोजी पोलिसांनी बॅरिकेट्स काढून चौक खुला केला. चौकात कार्यकर्त्यांच्या जल्लोषात पालकमंत्री सहभागी झाले. विरोधकांनी जल्लोष करत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. चौक खुला करण्याचे कुठलेही अधिकृत नोटिफिकेशन न काढल्याने निवडणूक आयोगाने याबाबत खुलासा मागवला होता. २१ जानेवारी रोजीच्या पोलिसांच्या जाहीर प्रगटनात मात्र निवडणुकीत राजकीय नेते, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वेळ वाचवण्यासाठी तत्काळ युटर्न घेता यावा, यासाठी चौक खुला केल्याचे नमूद केले आहे.
सात दिवसांचा कालावधी
सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी जारी केलेल्या प्रगटनात चौक भविष्यात खुला ठेवावा की रोज सकाळी ९ ते रात्री ९ वाजेदरम्यान बॅरिकेट्स लावून बंद करावा, याबाबत सात दिवसांच्या आत मोंढा नाका येथील निशा प्राईड इमारतीमधील सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) कार्यालयात लेखी स्वरूपात तसेच acptraff.abad@mahapolice.gov.in या ई-मेलवर आक्षेप, हरकती, सूचना मागवण्यात आल्या आहेत. हे दाखल करणाऱ्यांना पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक नोंदवणे बंधनकारक असेल.