नवीन पाणीपुरवठा योजनेतील गैरकारभाराची चौकशी करा; आमदार सतीश चव्हाण यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 14:29 IST2025-05-27T14:28:55+5:302025-05-27T14:29:37+5:30
नवीन पाणीपुरवठा योजनेच्या आर्थिक गैरकारभारासंदर्भात चव्हाण यांनी दि. २६ रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांना पत्र दिले.

नवीन पाणीपुरवठा योजनेतील गैरकारभाराची चौकशी करा; आमदार सतीश चव्हाण यांची मागणी
छत्रपती संभाजीनगर : शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असून, या गैरकारभाराची सखोल चौकशी करण्यासाठी शासनाने तातडीने चौकशी समिती नेमावी, अशी मागणी आ. सतीश चव्हाण यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांकडे केली आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेच्या आर्थिक गैरकारभारासंदर्भात चव्हाण यांनी दि. २६ रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांना पत्र दिले. या पत्रात म्हटले आहे की, छत्रपती संभाजीनगर येथील नवीन पाणीपुरवठा योजना वर्ष २०१९ मध्ये मंजूर करण्यात आली होती. काम वेळेत पूर्ण करून शहराला आवश्यक पाणीपुरवठा केला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आजही नागरिकांना १० ते १२ दिवसांनंतर पाणी मिळत आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. योजनेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. योजना पूर्ण होण्यासाठी आणखीन २ वर्षे लागतील, असे सांगितले जात आहे.
यंत्रसामग्री खरेदीत गैरव्यवहार
नवीन पाणीपुरवठा योजनेत जीव्हीपीआर कंपनीकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करण्यात येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. नियोजनात नसलेल्या आणि जीव्हीपीआर कंपनीशी संलग्न असलेल्या आणखीन एका दुसऱ्या कंपनीकडून कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री, पम्पिंग मशिनरी खरेदी करण्यात आली. बाजारात यापेक्षा दर्जेदार कंपन्यांची यंत्रसामग्री असताना, निकृष्ट दर्जाची यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांनी केला आहे.
तांत्रिक निकष, गुणवत्ता धाब्यावर
शहरात ५३ पाण्याच्या टाक्या उभ्या करायच्या होत्या. कंपनीकडून आजपर्यंत त्या उभारण्यात आलेल्या नाहीत. शहरात १८०० किलोमीटर जलवाहिन्या टाकायचे ठरले होते, त्यातील ५० टक्के सुद्धा काम पूर्ण झालेले नाही. जायकवाडी धरणात जॅकवेल उभारणीच्या कामात हलगर्जीपणा करण्यात येत असून, तांत्रिक निकष आणि गुणवत्ता धाब्यावर बसविण्यात आली आहे.
एअर व्हॉल्व्ह बसविण्याची पद्धत चुकीची
जलवाहिनी टाकताना चुकीच्या पद्धतीने एअर व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. नवीन पाणीपुरवठा योजनेतील संपूर्ण गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी शासनाने तातडीने चौकशी समिती नेमावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.