इमिग्रेशन चेकपोस्टच्या प्रतीक्षेत अडकली छत्रपती संभाजीनगरची आंतरराष्ट्रीय विमानसेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 20:20 IST2025-07-02T20:11:46+5:302025-07-02T20:20:02+5:30
महिनाभरापूर्वी ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडून पाहणी, अहवालाकडे लक्ष;विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र गेट तयार करण्यात आले आहे.

इमिग्रेशन चेकपोस्टच्या प्रतीक्षेत अडकली छत्रपती संभाजीनगरची आंतरराष्ट्रीय विमानसेवा
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा विमानतळावर महिनाभरापूर्वी ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या ३ अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला. आता या पाहणीच्या अहवालाची विमानतळ प्राधिकरणाला प्रतीक्षा असून, अहवालानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवेची दिशा ठरणार आहे.
गृहमंत्रालयाकडून इमिग्रेशन चेकपोस्टलाही (आयसीपी) मंजुरी मिळण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातून किमान हिवाळ्यात तरी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या ३ अधिकाऱ्यांनी महिनाभरापूर्वी विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला. या सुविधा आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या दृष्टीने योग्य आहेत की नाही, त्यात काही बदल करणे गरजेचे आहे का, या संदर्भात ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडून विमानतळाला अहवाल दिला जाईल. अद्यापपर्यंत हा अहवाल आलेला नाही, परंतु काही बदल करावे लागतील, अशी चिन्हे असल्याची माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली.
बँकाॅक विमानसेवेकडे डोळे
एअर एशिया एअरलाइन्सने वर्षभरापूर्वी बँकाॅक विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली. मात्र, गृहमंत्रालयाकडून इमिग्रेशन चेकपोस्टला (आयसीपी) मंजुरी मिळण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. ही आंतरराष्ट्रीय विमानसेवा कधी सुरू होते, याकडे विमान प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
विमानतळावर काय सुविधा सज्ज?
विमानतळ प्रशासनाने आंतरराष्ट्रीय विमानाच्या वाहतुकीसाठी विमानतळात वेगळी व्यवस्था केली आहे. त्यात आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांना प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी वेगवेगळी सुविधा केली आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या पासपोर्ट आणि व्हिसा तपासणीसाठी, इमिग्रेशन अधिकाऱ्यांसाठी जागा निश्चित करून देण्यात आली आहे. इमिग्रेशन काउंटर तयार करण्यात आले आहेत. याशिवाय संशयित व्यक्तींची तपासणी किंवा त्यांची माहिती जाणून घेण्यासाठी विशेष तपासणी कक्षही तयार करण्यात आले आहेत.