आठवडाभरात इंडिगोचे विमान तिसऱ्यांदा अचानक ‘जमिनीवर’; दिल्ली, मुंबई विमान रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 17:13 IST2025-11-08T17:12:27+5:302025-11-08T17:13:09+5:30
विमानतळावरील डिजिडल बोर्डवर मुंबई आणि दिल्लीचे विमान रद्द झाल्याची माहिती देण्यात आली.

आठवडाभरात इंडिगोचे विमान तिसऱ्यांदा अचानक ‘जमिनीवर’; दिल्ली, मुंबई विमान रद्द
छत्रपती संभाजीनगर : इंडिगोचे विमान अचानक रद्द होण्याचा प्रकार सुरूच आहे. आठवडाभरात तिसऱ्यांदा, शुक्रवारी सायंकाळी उड्डाण घेणारे मुंबई आणि दिल्लीचे विमान रद्द झाले, तर शनिवारी सकाळचेही विमान रद्द करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशनल कारणांचा दाखला देत विमान रद्द करण्याचा प्रकार होत आहे. त्यात शुक्रवारी दिल्ली विमानतळावरील एटीसी सिस्टममधील बिघाडाचाही फटका प्रवाशांना बसला.
मुंबईचे विमान अचानक रद्द होण्याच्या प्रकारांमुळे प्रवासी त्रस्त होत आहेत. शुक्रवारी मुंबईसह दिल्लीचेही विमान रद्द झाल्याने प्रवाशांचे नियोजनच बिघडले. विशेषत: मुंबई, दिल्लीवरून अन्य विमान असणाऱ्या प्रवाशांना याचा अधिक फटका बसला. विमान रद्द झाल्याची कल्पना देणारे मेसेज दुपारीच देण्यात आले. परंतु, त्यानंतरही काही प्रवासी विमानतळावर आले होते. स्थानिक इंडिगो प्रमुख अनिरुद्ध पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
कोणत्या दिवशी विमान रद्द ?
- इंडिगोची मुंबई मार्गावर सकाळी आणि सायंकाळी विमानसेवा आहे.
- १ नोव्हेंबर : रात्री ९:१५ वाजता मुंबईकडे जाणारे विमान रद्द.
- ३ नोव्हेंबर : सकाळी ७:१० वाजता मुंबईकडे जाणारे विमान रद्द.
- ७ नोव्हेंबर : सायंकाळी ७:१५ वाजता दिल्लीकडे जाणारे विमान रद्द
- ७ नोव्हेंबर : रात्री ९:१५ वाजता मुंबईकडे जाणारे विमान रद्द.
- ८ नोव्हेंबर : सकाळी ७:१० वाजता मुंबईकडे जाणारे विमान रद्द.
सेवा पूर्ववत होईल, ही अपेक्षा
या आठवड्यात तिसऱ्यांदा इंडिगोची मुंबई - छत्रपती संभाजीनगर- मुंबई विमानसेवा रद्द करण्यात आली. वारंवार होणारे असे व्यत्यय निराशाजनक आहेत आणि प्रवाशांवर परिणाम करत आहेत. आशा आहे की, इंडिगो याची दखल घेईल आणि लवकरच सेवा पूर्ववत करेल. दिल्लीच्या विमानतळावर एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) सिस्टीम बिघडली आहे, ज्यामुळे अनेक उड्डाणे विलंबित आणि रद्द झाली आहेत. शुक्रवारी सायंकाळचे इंडिगोचे मुंबई, दिल्ली विमान रद्द झाले. शनिवारी सकाळचे इंडिगोचे मुंबई विमानही रद्द करण्यात आले आहे.
-सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, ‘एटीडीएफ’