ऐन दिवाळी घरफोड्या, सोनसाखळी चोरींच्या घटनांत वाढ; गावाला जाताय ? हे अवश्य पाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 18:20 IST2025-10-18T18:15:34+5:302025-10-18T18:20:02+5:30
एन-३ मधून ७ तोळे सोने, १३२० ग्रॅम चांदीच्या मूर्ती चोरीला, साताऱ्यात घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास

ऐन दिवाळी घरफोड्या, सोनसाखळी चोरींच्या घटनांत वाढ; गावाला जाताय ? हे अवश्य पाळा
छत्रपती संभाजीनगर : ऐन दिवाळीत शहरात चोर, लुटारूंचा वावर वाढला आहे. २४ तासांत एन-३, सातारा परिसरात घरे फोडून लाखो रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेण्यात आली, तर सोनसाखळी चोराने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या गळ्यातील १६ ग्रॅमचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले. यामुळे सण, उत्सवात बाहेरगावी जाताना व खरेदीसाठी गर्दीत फिरताना दक्ष राहणे गरजेचे झाले आहे.
वडिलांची प्रकृती बिघडल्याने प्रियंका कुरेकर (एन-३, सिडको ) या आईसह त्यांना भेटण्यासाठी दि. ११ रोजी सकाळी १० वाजता घराला कुलूप लावून ठाण्याला गेल्या होत्या. १५ ऑक्टोबर रोजी त्यांची कार स्वच्छ करणारे अजीम यांना त्यांच्या हॉलमधील लाइट सुरू असल्याचे आढळले. ही बाब त्यांनी प्रियंका यांच्या आईला कळवली. कुरेकर यांनी तत्काळ माजी नगरसेवक प्रमोद राठोड यांना ही बाब कळवून मदत मागितली. राठोड यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक भंडारी यांना ही बाब कळवली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
चोरांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. लोखंडी कपाट फोडून त्यातील जवळपास ७ तोळे सोन्याचे दागिने, १३२० ग्रॅमच्या गणपती मूर्ती, समई, ८ हजार रोख रक्कम लंपास केली. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआरदेखील नेले. उपनिरीक्षक सुनील म्हस्के अधिक तपास करत आहेत.
सोनसाखळी चोरांचा सणात वावर वाढला
एन-७ मध्ये राहणाऱ्या अनिता प्रकाश ढगे (४९) या दि. १६ रोजी दुपारी १२:३० वाजता बजरंग चौकाकडून पोस्ट ऑफिसच्या दिशेने पायी जात होत्या. यादरम्यान विनाक्रमांकाच्या दुचाकीस्वारांपैकी मागे बसलेल्याने त्यांना 'येथे पीजी हॉस्टेल कुठे आहे' असे विचारले. ढगे यांनी त्याला माहिती नाही, असे सांगत असतानाच त्याने त्यांचे १६.८ ग्रॅमचे सोन्याचे गंठण हिसकावून सुसाट पोबारा केला. सिडको पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेशवेनगरात घरफोडी
सिंचन विभागातून सेवानिवृत्त झालेले चंद्रकांत सोनार (६३) हे कुटुुंबासह साताऱ्यातील पेशवेनगरमध्ये राहतात. ४ ऑक्टोबर रोजी ते गावाला गेले होते. १४ ऑक्टोबर रोजी त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून चोरी झाल्याचे समजले. ५ ग्रॅमचे मंगळसूत्र, ८ ग्रॅमची सोनसाखळी, ५०० ग्रॅम चांदीचे निरंजन, ५ हजार रुपये रोख लंपास केले. सातारा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
गावाला जाताय ? हे अवश्य पाळा
-दिवाळीदरम्यान अनेक जण मूळ गावी जातात. मात्र, यादरम्यान घरात मौल्यवान ऐवज ठेवू नका. प्रवासातदेखील नेताना बसमध्ये काळजी घ्या.
-गावाला जाण्यापूर्वी एखाद्या विश्वासू, शेजाऱ्याला घरात झोपण्यास सांगा.
-दरवाजाचे कुलूप आणि खिडक्या व्यवस्थित बंद करा. शक्य असल्यास मजबूत लॅच लॉक लावा. चोर कुलपाऐवजी मुख्यत्वे कडीकोंडा तोडतात.
-अपार्टमेंटच्या रहिवाशांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. सुरक्षारक्षक तैनात करावा.
-वृत्तपत्र, दूध घराबाहेर पडून राहणार नाही, याची काळजी घ्या.
-फिरण्यासाठी जात असाल तर दागिने, मौल्यवान ऐवज बँक तिजोरीत ठेवून जा.