जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीत महायुती, महाआघाडी आडून स्वबळाचे आखाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 17:52 IST2025-08-14T17:52:13+5:302025-08-14T17:52:35+5:30

आज बहुतांश नेते मंडळी महायुती, महाआघाडीसोबत आम्ही आहोत, असे सांगत असली तरी खासगीत स्वबळाचीच चर्चा जोमात आहे.

In the Zilla Parishad battle, Mahayuti and Mahaaghadi are the arenas of self-reliance. | जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीत महायुती, महाआघाडी आडून स्वबळाचे आखाडे

जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीत महायुती, महाआघाडी आडून स्वबळाचे आखाडे

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी दिवाळीनंतर सुरू होण्याचे घाटत आहे. गट, गण प्रभाग रचनेला अंतिम रूप १८ ऑगस्टनंतर येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सगळ्या राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, जिल्हा परिषद व तालुका पंचायत समित्या ताब्यात घेण्यासाठी आपापला अजेंडा निश्चित केला आहे. आज बहुतांश नेते मंडळी महायुती, महाआघाडीसोबत आम्ही आहोत, असे सांगत असली तरी खासगीत स्वबळाचीच चर्चा जोमात आहे. २०२२ साली मुदत संपून जि.प.वर प्रशासक राज आहे.

२०१७ ते २०२२ जि.प. मधील पक्षीय बलाबल: भाजप २४, शिवसेना १८, काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस २, अपक्ष २

जिल्हा परिषदेवर आमचाच झेंडा फडकणार
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आमचाच झेंडा फडकेल. ग्रामीण भागात विविध योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत भाजप पोहोचत आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दोन दिवसाआड संघटन बांधणीचा आढावा घेत आहेत. दोन दिवसांत ग्रामीण कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर १२ मंडळातील सर्व जि.प.गट, गण पिंजून काढण्यासाठी नियोजन सुरू होईल.
--- संजय खंबायते, जिल्हाध्यक्ष भाजप (ग्रामीण) :

सन्मानाने महायुती करायला तयार
आम्ही सन्मानाने महायुतीत लढायला तयार आहोत. जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पक्ष बांधणीकडे लक्ष दिलेले आहे. तालुका कार्यकारिणी जाहीर केल्या आहेत. निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांचा शोध घेत आहोत.
- आमदार सतीश चव्हाण, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार

जिल्ह्यात आम्हीच मोठे भाऊ
जिल्ह्यात खासदारासह आमचेच आमदार अधिक आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आमचेच सीट अधिक निवडून येतील. आमच्या पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे.
- भरत राजपूत, जिल्हाध्यक्ष शिंदे सेना.

महायुतीसोबत रिपाइं लढणार
जि.प., पं.स. आणि महापालिका निवडणूक महायुतीसोबत लढविण्याचा निर्णय रिपाइंच्या राज्य कमिटीच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. जि.प.साठी किमान ५ जागा, पं.स.साठी १० जागा आणि मनपासाठी २० जागांवर रिपाइं लढेल, असे बैठकीत ठरले आहे.
- बाबूराव कदम, प्रदेश कार्याध्यक्ष

जिल्हा परिषदेवर आमचाच अध्यक्ष
आम्ही निवडणुकीची तयारी मागील तीन वर्षांपासून करीत आहोत. नुकत्याच जि.प. सर्कलनिहाय आणि पंचायत समिती गणनिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागातील जनतेचा आमच्या प्रमाणिकपणावर विश्वास असून जि.प.वर आमचाच अध्यक्ष विराजमान होईल.
- माजी खासदार चंद्रकांत खैरे, उद्धव सेना नेते.

काँग्रेसतर्फे लवकरच निवडणूक आढावा
काँग्रेसतर्फे २५ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर व धाराशिव जिल्हा आढावा बैठक बोलावली आहे, त्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर चर्चा होईल. या आढावा बैठकीस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील आदींचे मार्गदर्शन होईल.
- किरण पाटील डोणगावकर, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

मविआ म्हणूनच लढण्याचा प्रयत्न
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. नुकताच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व सरचिटणीस रोहित पवार यांनी जिल्ह्याचा दौरा केला. कार्यकर्त्यांशी ते थेट बोललेले आहेत. वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर महाविकास आघाडी व्हावी, असे प्रयत्न केले जाणार आहेत. न झाल्यास स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार पदाधिकाऱ्यांना राहणारच आहेत.
- पांडुरंग तांगडे पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्ष.

महायुती सोडून आघाडीची तयारी
महायुती व संबंधित घटक पक्ष सोडून अन्य समविचारी पक्षासोबत आघाडी करून जि.प., पं.स. निवडणूक लढविण्याचा वंचित बहुजन आघाडीचा विचार आहे. कोणासोबत आघाडी करायची, हा निर्णय स्थानिक पातळीवरील पदाधिकारी घेतील. आघाडी झाली, तर जागा वाटपचा तिढा निर्माण होणार नाही, याबद्दल वाटाघाटी करून आम्ही किती जागा लढायच्या ते ठरवू.
- सिद्धार्थ मोकळे, मुख्य प्रवक्ता, वं.ब.आ.

आम्ही लढणार न्यायासाठी
वंचित आणि बहुजन वर्गातील लोकांना सोबत घेऊन आम्ही ग्रामीण भागात काम केले. माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्यानंतर पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमच्याशिवाय कोणीच काम केले नाही. शिवसेना-भाजप महायुतीमुळे हा जिल्हा ५० वर्षे मागे गेला आहे. त्यामुळे पाणी, शिक्षण, आरोग्याचे प्रश्न घेऊन सातत्याने लढत आहोत. येत्या निवडणुकीत जि.प. निवडणुकीत ५ उमेदवार करणार आहोत. सध्या बूथनिहाय काम सुरू आहे.
- रमेश गायकवाड, अध्यक्ष, मराठवाडा बहुजन विकास आघाडी

Web Title: In the Zilla Parishad battle, Mahayuti and Mahaaghadi are the arenas of self-reliance.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.