नात्याला काळिमा! अल्पवयीन मुलीवर सख्ख्या भावासह भाऊजीचा अत्याचार, पीडिता गर्भवती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 15:57 IST2023-03-21T15:56:47+5:302023-03-21T15:57:12+5:30
गंगापूर तालुक्यातील नात्याला काळीमा फासणारी घटना; आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

नात्याला काळिमा! अल्पवयीन मुलीवर सख्ख्या भावासह भाऊजीचा अत्याचार, पीडिता गर्भवती
गंगापूर ( छत्रपती संभाजीनगर ) : नात्याला काळीमा फासणारी घटना तालुक्यातील बोरगाव येथे घडली असून सख्या भावासह मावस भाऊजीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक म्हणजे मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुलीचा १९ वर्षीय भाऊ आणि नांदगाव येथील मावस भाऊजीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या मावस बहिणीच्या नवऱ्याने डिसेंबर २०२२ मध्ये तालुक्यातील बोरगाव येथे मुलीच्या घरी कोणी नसताना ''माझे तुझ्यावर प्रेम आहे ''असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. तसेच वाहेगाव येथेही रात्रीच्या वेळे अत्याचार केला. दरम्यान, पिडीता गर्भवती राहिल्याने प्रकरण उघडकीस आले. गुन्हा दाखल करताना सुरुवातीला मावस भाऊजीचे नाव पुढे आले, पण चौकशीत पीडितेच्या सख्खा भावाने देखील नववीच्या वर्गात शिकत असल्यापासून ते डिसेंबर २०२२ दरम्यान बोरगाव येथील राहत्या घरात वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
याप्रकरणी शनिवारी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून सोमवारी (२०) रोजी गंगापूर न्यायालयात उभे केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक डी.एस.साखळे, पोलीस नाईक सचिन चव्हाण, पोलीस अंमलदार भरत घुगे, महिला पोलीस हवालदार निंबोरकर हे करीत आहेत.