छत्रपती संभाजीनरात आता सकाळीही लूट; ज्येष्ठ नागरिकास गळ्याला चाकू लावून दागिने हिसकावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 13:42 IST2025-12-04T13:34:12+5:302025-12-04T13:42:00+5:30
रामनगरमध्ये भर जालना रोडवर धक्कादायक प्रकार; मुकुंदवाडी पोलिसांचे डीबी पथक झोपेतच

छत्रपती संभाजीनरात आता सकाळीही लूट; ज्येष्ठ नागरिकास गळ्याला चाकू लावून दागिने हिसकावले
छत्रपती संभाजीनगर : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या ज्येष्ठ नागरिकास चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले. त्यांच्या अंगावरील दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने ओढून घेत दुचाकीवरून पळ काढला. बुधवारी चक्क सकाळी ८:३० वाजता भर जालना रोडवर रामनगरमध्ये ही घटना घडली.
बाबूराव विठ्ठल लहाने (७४, रा. मुकुंदवाडी) हे सकाळी मित्र देसाई जाधव यांच्यासह नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी धूत रुग्णालयापासून विमानतळाकडे पायी गेले. तेथून दोघेही घराच्या दिशेने निघाले. जालना रोडवरून विठ्ठलनगरकडे वळत असतानाच चौकात त्यांना दोन दुचाकीवरील चौघांनी अडवले. एका दुचाकीवरील दोघांनी जाधव यांच्या खांद्यावर हात ठेवत धमकावून बाजूला नेले. दुसऱ्याने क्षणात लहाने यांच्या गळ्याला चाकू लावला. अंगावरील ८ ग्रॅमची अंगठी व गळ्यातील १२ ग्रॅमची सोनसाखळी हिसकावून काढत सुसाट पोबारा केला. दोघांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. लहाने यांच्या माहितीनुसार, दोन्ही दुचाकी विनानंबर प्लेट होत्या. चौघेही लुटारू सडपातळ व अंदाजे तिशीतले होते. त्यांच्या हातात लांब व मोठ्या आकाराचे चाकू होते.
सुस्तावलेल्या पोलिसांमुळे आत्मविश्वास वाढला
मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या महिन्याभरात हत्या, हत्येचा प्रयत्न, लुटमारीच्या घटनांनी विक्रम रचला आहे. पण, मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील डीबी पथक झोपेतच आहे. विशेष म्हणजे, वरिष्ठांकडूनदेखील याबाबत विचारणा होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सुस्तावलेल्या पोलिसांमुळेच आता सकाळीदेखील शस्त्रधारी टोळ्यांनी नागरिकांना लुटण्यास सुरुवात केल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.