थरारक! बायपासवर लघुशंकेसाठी कार थांबवताच ठेकेदाराचे बंदुकीच्या धाकावर अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 18:26 IST2025-06-21T18:26:06+5:302025-06-21T18:26:36+5:30

कुख्यात गुन्हेगारांनी पुण्याच्या ठेकेदारास छत्रपती संभाजीनगरात लुटले

In Chhatrapati Sambhajinagar Contractor of Pune kidnapped at gunpoint after stopping car for urination | थरारक! बायपासवर लघुशंकेसाठी कार थांबवताच ठेकेदाराचे बंदुकीच्या धाकावर अपहरण

थरारक! बायपासवर लघुशंकेसाठी कार थांबवताच ठेकेदाराचे बंदुकीच्या धाकावर अपहरण

छत्रपती संभाजीनगर : एमआयटी महाविद्यालयात लँड स्केपिंग डिझायनिंग करण्यासाठी पुण्याहून आलेला ठेकेदार बीड बायपासवर लघुशंकेसाठी थांबल्यानंतर तीन आरोपींनी पिस्टल, चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्याच गाडीत बसवून अपहरण केले. बीड बायपासवरून चारचाकीत मारहाण करीत दौलताबाद भागात नेत त्यांच्याजवळचे ३५ हजार आणि फोन पेवर पैसे मागवून घेत ६९ हजार व सोन्याची बाळी, असा ऐवज लुटला. ही घटना १८ जूनच्या रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, गुन्हे शाखेने या टोळीचा पर्दाफाश केला असून, तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

अक्षय ऊर्फ भैया रमेश वाहूळ (२४, रा. बावनघर, सातारा परिसर), कुणाल गौतम जाधव (२६, रा. अयोध्यानगर, एन ७, सिडको) आणि विनोद सुभाष शिंदे (२१, रा. गरमपाणी), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अक्षयविरुद्ध ११, कुणालविरुद्ध ७ आणि विनोदवर १ गुन्हा दाखल आहे. अक्षयवर ३ वेळा एमपीडीए व १ वेळा हद्दपारीची कारवाई झालेली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

अजित उत्तम जाधव (३३, रा. चाकण रोड, आळंदी, जि. पुणे) असे अपहरण झालेल्या डिझायनिंग ठेकेदाराचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी एमआयटी कॉलेजमधील काम करण्यासाठी घेतले होते. १८ जूनला दिवसभर काम केल्यानंतर शिवाजीनगर भागातील हॉटेलमध्ये जेवायला गेले. तेथून झाल्टा फाटा येथे मित्राला भेटण्यासाठी निघाले. रात्री ११:३० वाजता कारने (एमएच ४२ एएक्स ६०९१) जात असताना बीड बायपासवरील नवीन हेडगेवार हॉस्पिटलजवळ लघुशंकेसाठी थांबले. तेवढ्यात एका दुचाकीने ट्रीपलसीट लुटारू आले. त्यातील एकाने पाठीमागून येत चाकू लावत कारमध्ये बसायला लावले. चालकाच्या सीटवर बसल्यानंतर एकजण बाजूला बसला. दोघे मागील सीटवर बसले. मागील सीटवर बसलेल्या लुटारूने डोक्याला पिस्तूल लावून गाडी चालवायला सांगितली. त्यानंतर दोन मोबाइल, ३५ हजार रोकड असलेली बॅग हिसकावली. त्यातील एकजण अधूनमधून मारहाण करीत होता.

लुटारूंनी जाधव यांना पत्नीकडून फोन पेवर पैसे मागायला लावले. पत्नीने ३० हजार पाठविले. ते पैसे काढण्यासाठी आरोपींनी कार एटीएमकडे नेली. मात्र, तेथून फक्त ४ हजार रुपये निघाले. त्यानंतर दुसऱ्या एटीएमवर जाऊन ही रक्कम काढून घेतली. ६५ हजार रुपये हातात पडल्यानंतरही आरोपींनी पुन्हा पत्नीकडे पैसे मागायला लावले. जाधव यांनी पत्नीला फोन करून पैसे मागितल्यावर पत्नीने फोन पे वरून पैसे जात नसल्याचे कळविले. मात्र, त्याचवेळी आरोपीने मोबाइल हिसकावून ‘अगर तू पैसे नही भेजेगी तो ये मर जायेगा’ अशी धमकी दिली आणि फोन ठेवला. त्यानंतर पत्नीने जाधव यांच्या वडिलांना हा प्रकार सांगितला. वडिलांनी ३० हजार रुपये पाठविले, मात्र क्रांती चौक पोलिसांना माहिती देऊन अजित जाधव अडचणीत असल्याचे कळविले. त्यानंतर क्रांती चौक पोलिसांनी जाधव यांच्या मोबाइलवर फोन करून विचारपूस केली. मात्र, हा प्रकार लुटारूंना समजला. त्यानंतर आरोपींनी जाधव यांना पुन्हा मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

कार थांबविताच फिर्यादी पळाले
आरोपी जाधव यांना मारहाण करण्यासाठी कार थांबविताच जाधव हे कारचा दरवाजा उघडून पळून गेले. एका दुकानाच्या मागे गवतात लपून बसले. काही वेळाने रस्त्यावर आल्यानंतर एकाच्या मदतीने पोलिसांना फोन लावला. पोलिसांच्या मदतीने एमआयडीसी सिडको ठाण्यात आणले. तेथे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

१८ जून रोजीही दोघांना लुटले
या लुटारूंच्या टोळीने १८ जूनच्या रात्री बीड बायपासवर अजित जाधव यांच्यासह महेश रावसाहेब नरवडे (३४, रा. विश्रांतीनगर, मुकुंदवाडी) आणि शरद वायाळ या दोन्ही मित्रांनाही मारहाण करून लुटले. त्यांचे दोन मोबाइल, १० हजार रोकड आणि बायोमेट्रिक मशीन, असा ऐवज लुटला होता. या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.

Web Title: In Chhatrapati Sambhajinagar Contractor of Pune kidnapped at gunpoint after stopping car for urination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.