एका क्षणात होत्याचे नव्हते झालं! मोपेडवरून निघालेल्या पती-पत्नीला भरधाव ट्रकने चिरडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 14:15 IST2025-10-28T14:13:02+5:302025-10-28T14:15:27+5:30
पोलिसांची तात्काळ धाव; मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविले; वाळूज एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत

एका क्षणात होत्याचे नव्हते झालं! मोपेडवरून निघालेल्या पती-पत्नीला भरधाव ट्रकने चिरडलं
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर परिसरात सोमवारी (दि. २७ ऑक्टोबर) दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मोपेडस्वार पती-पत्नी ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाले. भरधाव अज्ञात ट्रकने मोपेडला पाठीमागून जोरदार धडक देत त्यांना चिरडून तेथून पळ काढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसगाव, ता. धाराशिव (हल्ली मुक्काम साठेनगर, वाळूज) येथील संजय पंडित राऊत (वय ३८) व त्यांची पत्नी अनिता संजय राऊत ( ३४) हे विनानंबरच्या मोपेडवरून छत्रपती संभाजीनगरकडून वाळूजच्या दिशेने येत होते. मागून भरधाव येणाऱ्या एका अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोघेही रस्त्यावर पडले आणि ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच वाळूज वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शंकर शिरसाट, पोलिस हेडकॉन्स्टेबल अरुण फौलाने, विकास कांबळे, कॉन्स्टेबल किशोर साळवे, शमशू कादरी तसेच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल मनोज बनसोडे व सुहास मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविले. अपघातानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर–वाळूज या दोन्ही मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. पोलिसांनी अपघातग्रस्त स्कूटी बाजूला काढून ताब्यात घेतली व वाहतूक सुरळीत केली. तोपर्यंत अपघातस्थळापासून ए. एस. क्लबपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अज्ञात ट्रक व चालकाचा शोध वाळूज एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे.