तोतया पोलिस उपनिरीक्षकाचा तरुणीवर अत्याचार; १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 12:55 IST2026-02-28T12:50:10+5:302026-02-28T12:55:01+5:30
पोलिस असल्याचं खोटं सांगितलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन् अत्याचार केला; जळगावच्या नराधमाला १० वर्षे सक्तमजुरी

तोतया पोलिस उपनिरीक्षकाचा तरुणीवर अत्याचार; १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
छत्रपती संभाजीनगर : पोलिस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून २४ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी अमित लालखा तडवी (२४, रा. गोंदेगाव, ता. जामनेर, जि. जळगाव, ह.मु. छत्रपती संभाजीनगर) याला सत्र न्यायाधीश आर.डी. खेडेकर यांनी शुक्रवारी (दि. २७) १० वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली १५ हजार रुपये दंड ठोठावला. दंडापैकी १० हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशात नमूद आहे.
काय आहे प्रकरण ?
फिर्यादीनुसार फेब्रुवारी २०२३ पासून आरोपी अमित तडवी त्यांच्या घरात किरायाने राहत होता. मे २०२३ मध्ये तरुणीच्या आईवर शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून अमित त्यांना मदत करीत होता. त्याची तरुणीशी मैत्री झाली. पोलिस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून त्याने ओळख वाढविली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. १९ सप्टेंबर २०२३ रोजी तरुणी घरात एकटी असताना आरोपीने बळजबरी शरीरसंबंध प्रस्थापित केला. सदर तरुणी, तिचा भाऊ, आरोपी आणि त्याचा मित्र २२ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबईला गेले होते. तेथे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पुन्हा अत्याचार केला. त्याची तोतयेगिरी समोर आल्यावर १३ फेब्रुवारी २०२४ रोजी त्याला घरातून हाकलून दिले होते. त्यानंतर त्याच्या मित्राने धमकी दिली. याबाबत सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
खटल्याची सुनावणी व शिक्षा
तत्कालीन उपनिरीक्षक ई.एस. कामठे यांनी दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीवेळी साहाय्यक लोकअभियोक्ता अरविंद बागुल यांनी ११ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यात पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून कलम ३७६ (२)(एन) अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार दंड, कलम ४१७ आणि कलम १७० अन्वये एक वर्षाचा कारावास आणि प्रत्येकी २ हजार दंड आणि कलम ५०६ अन्वये ६ महिन्यांचा कारावास आणि एक हजाराचा दंड ठोठावला.