तोतया महिला आयएएस अधिकारी: फसवणूक झालेल्यांना साक्षीदार करण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 14:50 IST2025-12-06T14:45:26+5:302025-12-06T14:50:02+5:30
कल्पनाच्या पोलिस कोठडीचे १३ दिवस पूर्ण, तेरा दिवसांत फसवणूक, बनावट कागदपत्रांच्याच दिशेने तपास

तोतया महिला आयएएस अधिकारी: फसवणूक झालेल्यांना साक्षीदार करण्याची शक्यता
छत्रपती संभाजीनगर : तोतया महिला आयएएस अधिकारी कल्पना भागवत हिने अनेकांना अधिकारी असल्याचे भासवून पैसे घेतले. सुरुवातीला अफगाणी प्रियकरामुळे गंभीर वळण मिळाले होते. मात्र, आता फसवणुकीच्याच अनुषंगाने तिने पैसे घेतलेल्या व्यक्तींना आता गुन्ह्यात साक्षीदार करण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
दि. २३ नोव्हेंबर रोजी जालना रस्त्यावरील हॉटेलमधून कल्पनाला ताब्यात घेण्यात आले. सहा महिन्यांपासून वास्तव्य असल्याने तपास यंत्रणांना संशय आल्यानंतर सिडको पोलिसांनी महिला अधिकाऱ्यांच्या मदतीने तिची चौकशी केली. तिच्या खोलीच्या तपासणीत आयएएस अधिकारी असल्याचे कागदपत्रे आढळल्यानंतर तिला अटक करण्यात आली. न्यायालयाने ६ डिसेंबरपर्यंत दहा दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे आज दुपारी तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येईल.
एक दिवसाच्याच पोलिस कोठडीचा अधिकार
साधारण १४ दिवसांच्या पोलिस कोठडीचा पोलिसांना अधिकार आहे. शनिवारी कल्पनाच्या १३ दिवसांच्या पोलिस कोठडीचा कालावधी पूर्ण होत आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार, कल्पना बाबतची प्रत्यक्षातली चौकशी पूर्ण झाली असून, आता केवळ तांत्रिक पुरावे व नोटीस पाठविलेल्या २८ जणांच्या जबाबावरच तपास होणार आहे.
फसवणूकीच्या दिशेने तपास
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कल्पनाच्या तेरा दिवसांच्या चौकशीत आयएएस असल्याचे भासवून तिने पैसे घेतल्याचे सबळ पुरावे हाती लागले आहे. त्यामुळे शनिवारी पोलिस न्यायालयात नव्याने काय भूमिका मांडतात, पोलीस एक दिवसाच्या वाढीव पोलिस कोठडीची मागणी करणार की तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशरफ, डीम्पीची चौकशी सुरूच
अटकेतील मोहम्मद अशरफ गिल व तोतया ओएसडी डीम्पी देवेंद्रकुमार हरजाई या दोघांची अजूनही चौकशी सुरू आहे. सोमवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपेल.