'मी आत्महत्या करीत आहे'; भावाला मेसेज केला अन् चिमुकलीसह आईने रेल्वेतून उडी घेतली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 16:47 IST2022-04-09T16:47:35+5:302022-04-09T16:47:54+5:30
कौटुंबिक वादातून माहेरी आलेल्या विवाहितेस सासरचे लोक घेऊन जाण्यास आले होते, तेव्हा विवाहितेने उचले टोकाचे पाऊल

'मी आत्महत्या करीत आहे'; भावाला मेसेज केला अन् चिमुकलीसह आईने रेल्वेतून उडी घेतली
लासूर स्टेशन ( औरंगाबाद ) : मी आत्महत्या करीत असल्याचा मेसेज भावाला मोबाइलवर करून, एका २४ वर्षीय महिलेने आपल्या दोन वर्षीय चिमुकलीसह धावत्या रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना लासूर स्टेशन ते पोटूळदरम्यान घडली. पूनम गणेश विसपुते (रा.नवसारी, गुजरात, ह.मु. नाथनगर, बालाजीनगर, औरंगाबाद) असे आईचे, तर शंभवी गणेश विसपुते असे मयत चिमुकलीचे नाव आहे.
औरंगाबाद येथील पूनम हिचा नवसारी, गुजरात येथील गणेश विसपुते याच्याशी विवाह झाला होता. घरगुती वादामुळे पूनम ही सहा ते सात महिन्यांपासून औरंगाबाद येथील नाथनागर, बालाजीनगरात आईकडे मुलगी शंभवीसह राहत होती. पतीसह सासरचे लोक त्यांना नेण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत जायचे नाही, म्हणून पूनमने बहाणा करीत सोनाराकडे असलेले सोने घेऊन येते, असे सांगितले व घरातून छोट्या शंभवीसह बाहेर पडली.
ती सरळ औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर आली व रेल्वेत बसली. लासूर स्टेशन ते पोटूळच्या दरम्यान खडक नारळाजवळ पूनमने भावाला मी आत्महत्या करीत असल्याचा मेसेज पाठविला आणि शंभवीसह धावत्या रेल्वेतून उडी घेतली. रेल्वे पटरीवर आत्महत्या झाल्याची माहिती मिळताच, शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर, पोकॉ.मनोज औटे, अनिल दाभाडे, संतोष पवार यांच्यासह रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोष सोमाणी घटनास्थळी दाखल झाले. पर्समध्ये सापडलेल्या मोबाइलवरून त्यांची ओळख पटविण्यात आली. दोघी माय-लेकीला लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता, आरोग्य अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.