अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला, वाळू माफियास ३ लाख ८० हजाराचा जबर दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 18:18 IST2022-01-12T18:18:07+5:302022-01-12T18:18:37+5:30
चितेगाव येथील टोलनाक्यावर तहसीलदारांच्या पथकाची कारवाई

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला, वाळू माफियास ३ लाख ८० हजाराचा जबर दंड
पैठण ( औरंगाबाद ) : वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक तहसीलदारांनी आज पैठण-औरंगाबाद रोडवर जप्त केला. ट्रक मालकास नवीन नियमानुसार तब्बल ३ लाख ८० हजार ००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मोठ्या रकमेचा दंड आकारल्याने अवैध वाळू वाहतुकदारास चपराक बसली आहे.
आज दुपारी चितेगाव येथील टोलनाक्यावर तहसीलदार दत्तात्रय निलावाड, तलाठी जितेंद्र राठोड, कोतवाल सतीश दळवे यांचे पथक कारवाई करत होते. यावेळी पथकाने एक संशयित ट्रक ( एमएच २० डी ५०६५ ) थांबवला. तपासणी केली असता ट्रकमध्ये सहा ब्रास वाळू आढळून आली. मात्र, ट्रक चालकाकडे रॉयल्टी कागदपत्रे आढळून आली नाही. यामुळे पथकाने पंचनामा करून ट्रक जप्त करून बीडकीन येथील शासकीय गोदामात लावला.
तसेच नवीन नियमानुसार वाहनास शास्तीची रक्कम रुपये- २ लाख आणि ६ ब्रास वाळुकरीता बाजारभाव प्रतिब्रास रक्कम रुपये- ६०००/- या प्रमाणे पाचपट दंडाची रक्कम रुपये १ लाख ८० हजार अशी एकूण ३ लाख ८० हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांनी दिली.