हद्द झाली! घाटी रुग्णालयात उघडले अवैध औषधी दुकान; अधिष्ठातांची कारवाई, गुन्हा दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:30 IST2025-11-14T18:29:38+5:302025-11-14T18:30:34+5:30
रुग्णालय प्रशासनाने कारवाई करून दुकान केले बंद

हद्द झाली! घाटी रुग्णालयात उघडले अवैध औषधी दुकान; अधिष्ठातांची कारवाई, गुन्हा दाखल होणार
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात अवैधरित्या औषधी दुकान सुरू केल्याचे लक्षात येताच रुग्णालय प्रशासनाने ते बंद करण्याची कारवाई केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.
घाटी रुग्णालयातील मेडिसीन विभागाच्या इमारतीजवळून सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जागेत अवैधरीत्या औषधी दुकान सुरू केल्याची तक्रार रुग्णालय प्रशासनाला गुरुवारी मिळाली. अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे, उपअधिष्ठाता डाॅ. के. डी. गर्कळ यांनी औषधी दुकानावर धाड टाकली. अवैधरीत्या सुरू केलेलेे असल्याने हे दुकान तात्काळ बंद करण्यात आले. पुढील कायदेशीर कारवाई रुग्णालय प्रशासनाकडून केली जाणार आहे.
गुन्हा दाखल करण्याचे आदेश
धाड टाकून हे दुकान बंद करण्यात आले. संबंधित दुकानदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सुरक्षा अधिकारी सुरेश भाले व आरएमओ यांना दिले. या जागेवर पूर्वी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पतपेढीला पर्यायी जागा दिलेली असल्यामुळे या जागेशी पतपेढीचा आता कोणताही संबंध नाही. या जागेचा उपयोग नवीन सर्जिकल इमारतीसाठी होणार आहे. त्यामुळे याठिकाणी असलेले हे बांधकाम पाडण्यात येणार आहे.
- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता