रोहयो कामांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: July 22, 2014 00:50 IST2014-07-22T00:43:57+5:302014-07-22T00:50:38+5:30
सुनील कच्छवे, औरंगाबाद रोजगार हमी योजने (नरेगा) अंतर्गत संपूर्ण मराठवाड्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर कामे होत असली तरी त्यात गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रोहयो कामांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष
सुनील कच्छवे, औरंगाबाद
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (नरेगा) अंतर्गत संपूर्ण मराठवाड्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर कामे होत असली तरी त्यात गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नरेगा आयुक्तालयामार्फत सहा महिन्यांत करण्यात आलेल्या तपासणीत केवळ ६७ टक्केच कामे समाधानकारक झाल्याचे आढळले आहे. उर्वरित ३० टक्के कामांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना निरीक्षकांनी दिल्या आहेत. तर ३ टक्के कामे पूर्णपणे असमाधानकारक आहेत. त्यामुळे ही कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
नरेगांतर्गत लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कुशल आणि अकुशल पद्धतीची सुमारे २० प्रकारची कामे केली जातात. लोकांना रोजगार देण्याबरोबरच ग्रामीण भागात टिकाऊ साधनसंपत्ती निर्माण व्हावी हाही यामागील हेतू आहे. मात्र, रोहयोची कामे व्यवस्थित होत नसल्याचे आढळल्यामुळे नागपूर येथील नरेगा आयुक्तालयातर्फे या कामांची गुणवत्ता तपासणी करण्यात येत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हे काम सुरू आहे. त्यासाठी नरेगा आयुक्तांनी राज्य गुणवत्ता व्यवस्थापन निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. हे निरीक्षक ठिकठिकाणी जाऊन रोहयोच्या कामांची गुणवत्ता बघत आहेत. गेल्या सहा महिन्यांत या निरीक्षकांनी मराठवाड्यात एक हजारपेक्षाही अधिक कामांची तपासणी केली आहे. त्यापैकी केवळ ६७ टक्केच कामे त्यांना समाधानकारक आढळली आहेत. उर्वरित कामांपैकी ३० टक्के कामांमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे अहवालात म्हटले आहे.
३ टक्के कामे पूर्णपणे असमाधानकारक किंवा अर्धवट झालेली आहेत. या कामांमध्ये अनियमितता झाल्यामुळे त्यात अधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्याची सूचना निरीक्षकांकडून करण्यात आली आहे. मराठवाड्यात आठही जिल्ह्यांत अशी असमाधानकारक कामे आढळली असून, त्या- त्या जिल्हाधिकाऱ्यांना याविषयी निरीक्षकांनी अहवाल सादर केला आहे. त्यावर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी हे अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयातील रोहयो उपायुक्त डॉ. अनिल रामोड यांच्याकडे पाठविले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात असमाधानकारक कामांचे प्रमाण सर्वाधिक आहे. रोहयोंतर्गत शेततळे, रस्ते, खडीकरण, सिमेंट नालाबांध, खेळाची मैदाने, नालाबंडिंग, शौचालये आदी प्रकारची कामे केली जातात.
दोषी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
तपासणीत असमाधानकारक काम आढळल्यास दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करणे अपेक्षित आहे. ही कारवाई जिल्हाधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. सध्या मराठवाड्यात सुमारे ३ टक्के कामांमध्ये अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचे काम सुरू आहे. यानंतर दोषी अधिकाऱ्यांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
मराठवाड्यात १४ निरीक्षकांची नियुक्ती
नरेगा आयुक्तांनी मराठवाड्यासाठी १४ गुणवत्ता निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे गुणवत्ता निरीक्षक कृषी, जलसंपदा, वन, सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी आहेत. प्रत्येक निरीक्षकाला नरेगा आयुक्तालयातर्फे दरमहा १० ते १५ कामे नमुना निवड पद्धतीने तपासणीसाठी दिली जात आहेत. त्यानंतर या कामांना प्रत्यक्ष भेट घेऊन हे निरीक्षक त्याचा दर्जा ठरवत आहेत. दर्जा ठरल्यानंतर त्याचा अहवाल जिल्हाधिकारी आणि नरेगा आयुक्तांना पाठविला जात आहे. दर्जानुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई करणे बंधनकारक आहे. समाधानकारक दर्जाच्या कामांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारणा करणे अपेक्षित आहे.