तुमच्यात धमक असेल तर पाणी देऊन दाखवा; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 19:14 IST2025-05-17T19:13:31+5:302025-05-17T19:14:16+5:30
उद्धवसेनेचे मिथुन व्यास आणि सहकारी २५ शेळ्यांसह मोर्चात सहभागी होते. त्यांनी प्रत्येक शेळीच्या गळ्यात ‘लबाडांनो, पाणी द्या’ अशी पाटी लटकावली होती.

तुमच्यात धमक असेल तर पाणी देऊन दाखवा; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती संभाजीनगरवासीयांना तीन महिन्यांत पाणी देऊ, असे तुम्ही ओरडून सांगत होता. नुसते ओरडून चालत नाही, तर काम करावे लागते, तुमच्यात धमक असेल तर पाणी देऊन दाखवा, असे खुले आव्हान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येथे एका जाहीर सभेत दिले.
शहराच्या पाणीप्रश्नांवर उद्धवसेनेच्या वतीने एक महिन्यापासून ‘लबाडांनो, पाणी द्या’ हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनांतर्गत शुक्रवारी सायंकाळी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौक ते गुलमंडी असा हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या समारोपप्रसंगी गुलमंडी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर सेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे, सेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आदित्य म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपण घनकचरा व्यवस्थापन किंवा एसटीपी प्रकल्प, सीबीसी शाळा आणि रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये दिले. या शहरासाठी अनेक योजना आणल्या. लाडकी बहीण योजनेचे २१०० रु. मिळाले का, असा सवाल त्यांनी उपस्थित महिलांना केला. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत, कर्जमाफीची घोषणा आता अजितदादांना आठवत नाही. या शहराला केवळ उद्धवसेनाच पाणी देऊ शकते, असे ते म्हणाले. तत्पूर्वी खैरे, दानवे आणि ज्योती ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भाजपवर टीका केली. मोर्चानंतर आदित्य ठाकरे, खैरे व आ. दानवे यांनी महापालिकेत जाऊन शहराच्या पाणीप्रश्नावर प्रशासक जी. श्रीकांत यांना निवेदन दिले.
‘लबाडांनो, पाणी द्या’ घोषणेने दणाणला मार्ग
क्रांती चौकापासून काढलेल्या मोर्चात अग्रभागी महिला हातात रिकामे हंडे घेऊन सहभागी झाल्या होत्या. गळ्यात भगवा रुमाल, हातात भगवा झेंडा घेतलेले आंदोलक घोषणा देत होते. क्रांती चौकापासून गुलमंडीपर्यंत आदित्य पायी चालत गेले. खैरे यांच्या पायाला दुखापत असल्याने ते एका खुल्या वाहनातून मोर्चास्थळी आले.
शेळ्यांच्या गळ्यात लटकावल्या पाट्या
उद्धवसेनेचे मिथुन व्यास आणि सहकारी २५ शेळ्यांसह मोर्चात सहभागी होते. त्यांनी प्रत्येक शेळीच्या गळ्यात ‘लबाडांनो, पाणी द्या’ अशी पाटी लटकावली होती. एक आंदोलक संपूर्ण अंगाला फोम लावून विना कपड्याचा सहभागी होता. त्याच्या एका हातात ‘आंघोळीला पाणी द्या’ असा फलक होता. मोर्चाच्या प्रारंभी क्रांती चौक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आणि सह्यांची मोहीम राबविण्यात आली. आदित्य ठाकरे यांनी यात सहभाग नाेंदविला.