शेतकऱ्यांनो, भाव मिळत नाही तर शेतमाल तारण ठेवा अन् कर्ज मिळवा; काय आहे योजना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 13:13 IST2025-02-12T13:13:21+5:302025-02-12T13:13:57+5:30
बाजार समितीच्या गोदामात ठेवलेल्या शेतमालाचे गोदाम भाडे, विमा व इतर अनुषांगिक खर्च बाजार समितीमार्फत करण्यात येते

शेतकऱ्यांनो, भाव मिळत नाही तर शेतमाल तारण ठेवा अन् कर्ज मिळवा; काय आहे योजना?
छत्रपती संभाजीनगर : गेल्या वर्षी जिल्ह्यात शेतमाल तारण योजनेला प्रतिसाद वाढण्याची गरज आहे. कृषी पणन मंडळ यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु, १९९१पासून सुरू असलेल्या या योजनेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांसाठीच्या कृषी पणन मंडळामार्फत ही योजना हाताळली जाते.
काय आहे योजना?
मूग, उडीद, सोयाबीन, धान (भात), तूर, सूर्यफूल, करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, हरभरा, हळद, बेदाणा, वाघ्या घेवडा (राजमा), सुपारी, काजूबी या शेतमालाचा तारण कर्ज योजनेत समावेश आहे. यापैकी पहिल्या बारा शेतमालाचे बाजारभाव अथवा किमान आधारभूत किंमत यापैकी कमी दरानुसार होणाऱ्या एकूण किमतीच्या ७५ टक्क्यांपर्यंत तारण कर्ज त्वरित उपलब्ध होते. हळदीच्या प्रचलित बाजारभावाच्या ७५ टक्के इतके शेतमाल तारण कर्ज देण्यात यावे, बेदाण्याची प्रतिक्विंटल ७ हजार ५०० किमान किंमत किंवा प्रचलित बाजारभाव जी कमी असेल, तो दर हा शंभर रुपयांपेक्षा जास्त विचारात घेऊ नये, इ. नियम यात आहेत. बाजार समितीच्या गोदामात ठेवलेल्या शेतमालाचे गोदाम भाडे, विमा व इतर अनुषांगिक खर्च बाजार समितीमार्फत करण्यात येईल. वखार महामंडळाच्या गोदामात शेतमाल ठेवून घेतलेल्या वखार पावतीवरही शेतमाल तारण कर्ज उपलब्ध आहे.
व्याजदर किती?
कर्ज घेतल्यापासून १८० दिवसांपर्यंत द. सा. द. शे. ६ टक्के दराने व्याज आकारणी होते. चार वर्षांत ५३४ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला.
तारण ठेवणारे शेतकरी किती?
वर्ष संख्या कर्ज
२०२१-२२:२६२
२०२२-२३:२६९
२०२३-२४:१२२
२०२४-२५:३
योजनेचा लाभ घ्यावा
शेतमालाला कमी भाव मिळत असल्यास शेतकऱ्यांनी तारण योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेच्या प्रचार - प्रसारासाठी कृषी पणन मंडळ प्रयत्नशील आहे. बसस्टँडवर ‘जिंगल’ वाजवून प्रसिध्दी केली. बाजार समित्यांमध्ये पोस्टर्स पोहोचवले. कृषी प्रदर्शनांमधून प्रचार केला.
- जी. सी. वाघ, विभागीय उपसरव्यवस्थापक, कृषी पणन मंडळ, छत्रपती संभाजीनगर