पवित्र पोर्टलवर शिक्षकांच्या रिक्तपदाची जाहिरात न दिल्यास मुख्याध्यापक, प्राचार्य राहणार जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 14:25 IST2025-02-26T14:24:27+5:302025-02-26T14:25:13+5:30

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या नोंदणीसाठी शेवटचे तीन दिवस

If the vacancy of teachers is not advertised on pavitra portal, the Headmaster, Principal will be responsible | पवित्र पोर्टलवर शिक्षकांच्या रिक्तपदाची जाहिरात न दिल्यास मुख्याध्यापक, प्राचार्य राहणार जबाबदार

पवित्र पोर्टलवर शिक्षकांच्या रिक्तपदाची जाहिरात न दिल्यास मुख्याध्यापक, प्राचार्य राहणार जबाबदार

छत्रपती संभाजीनगर : पवित्र पोर्टलद्वारे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षणसेवक, शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी २० जानेवारी ते २० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक संस्थाचालकांनी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यास अनुत्सुकता दाखविली. त्यामुळे नोंदणीला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत रिक्त पदे असून, पोर्टलवर नोंदणी न करणाऱ्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्य रिक्त पदांसाठी जबाबदार राहतील, असा इशारा विभागीय शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद यांनी अल्पसंख्याक वगळून सर्व व्यवस्थापनांना दिला आहे.

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीला सुरुवात झालेली आहे. खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशत: अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना रिक्त पदांसाठी बिंदूनामावली प्रमाणित करून पवित्र पोर्टलवर नोंदणी करायची आहे. त्यानुसार २० जानेवारीपासून सुरुवात झाली होती. महिनाभर मुदत दिल्यानंतरही अनेक संस्थांनी नोंदणीच केली नसल्याचे उघडकीस आले आहे. संस्थेची बिंदुनामावली अद्ययावत नसल्यास शिक्षक नियुक्तीबाबतची कार्यवाही करता येणार नाही. त्यामुळे बिंदुनामावलीअभावी पवित्र पोर्टलद्वारे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीपासून वंचित राहिल्यास त्यास संबंधित प्राचार्य, मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन जबाबदार राहणार असल्याचेही पत्रात म्हटले आहे. त्यामुळे २८ फेब्रुवारीपर्यंत छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील अल्पसंख्याकवगळून इतर खासगी व्यवस्थापनांनी तत्काळ पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन मुकुंद यांनी केले आहे.

एवढ्या संख्येची नोंदणी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १४ संस्थांनी नोंदणी केली आहे. या संस्थांमध्ये शिक्षकांच्या २७३ जागा भरण्यात येणार आहेत. त्यात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील १६६, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतील ३८ जागांचाही समावेश आहे. त्याशिवाय इतर चार जिल्ह्यांतही संस्थांमधील रिक्त जागांची आकडेवारी समोर येत आहे.

प्रक्रियेत सहभागी व्हावे
अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षण सेवक, शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करून प्रक्रियेत सर्वांनी सहभागी व्हावे.
- प्रकाश मुकुंद, उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर विभाग

Web Title: If the vacancy of teachers is not advertised on pavitra portal, the Headmaster, Principal will be responsible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.