लाईट गेली तर परत कधी येणार? ‘नो गॅरंटी..!’ वीज कर्मचारी आजपासून ३ दिवस संपावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 12:28 IST2025-10-09T12:25:25+5:302025-10-09T12:28:41+5:30
तीन दिवसीय संपाच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालीन नियोजन करण्यात आले.

लाईट गेली तर परत कधी येणार? ‘नो गॅरंटी..!’ वीज कर्मचारी आजपासून ३ दिवस संपावर
छत्रपती संभाजीनगर : महावितरणच्या पुनर्रचनेच्या विरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीकडून ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान संपाची हाक देण्यात आली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर महावितरणने वीज यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. परंतु बिघाडामुळे कुठे वीजपुरवठा खंडित झाला तर दुरुस्ती होऊन वीजपुरवठा सुरळीत होण्यास विलंब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तीन दिवसीय संपाच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालीन नियोजन करण्यात आले. गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. रजेवरील कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रुजू होण्याची सूचना देण्यात आली आहे. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी निवडसूचीवर असलेल्या सर्व कंत्राटदारांना आवश्यक साधनसामुग्री, मनुष्यबळ व वाहनांसह संबंधीत कार्यालयांमध्ये उपलब्ध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एखाद्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला, त्या ठिकाणी सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून (बॅकफिड) वीजपुरवठा सुरू करण्यात येईल, असे नियोजन महावितरणने केले आहे.
ग्राहकांच्या सेवेवर परिणाम
कामगार आयुक्तांकडे बैठक झाली. त्यातून काही तोडगा निघालेला नाही. तीन दिवसांच्या संपात जिल्ह्यातील सुमारे ५ हजार अधिकारी-कर्मचारी सहभागी होतील. संपामुळे वीज ग्राहकांच्या सेवेवर परिणाम होईल.
- अविनाश चव्हाण, मराठवाडा प्रादेशिक सचिव, सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन
चर्चा निष्फळ
व्यवस्थापनासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरली. पुनर्रचनेनुसार नव्या भागात काम करणे कर्मचाऱ्यांना अशक्य होईल. त्याचा ग्राहकांनाच फटका बसेल. संपामुळेही ग्राहक सेवेवर परिणाम होईल. कर्मचाऱ्यांच्या सूचनांचा अंतर्भाव करून पुनर्रचना करावी.
- अरुण पिवळ, महामंत्री, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ
कोणकोणत्या सेवांवर होऊ शकतो परिणाम
- तांत्रिक बिघाडांवर तत्काळ दुरुस्ती होण्यास अडचण येऊन अनेक भागांत वीजपुरवठा तासन्तास बंद राहण्याची शक्यता आहे.
- कार्यालयांमध्ये काम करणारे कर्मचारी संपावर असल्याने ग्राहकांच्या तक्रारी तत्काळ नोंदवून घेतल्या जाणार नाहीत. ऑनलाईन तक्रारींचीही कार्यवाही विलंबाने होईल.
- नवीन वीजजोडणी, नावांत बदल किंवा कनेक्शन ट्रान्सफर यासारखी प्रशासकीय कामे प्रलंबित राहणार आहेत.
परिमंडळात सुरळीत वीजपुरवठ्याचे नियोजन
संपकाळात छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. परिमंडळ व मंडल कार्यालयांत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून, त्यात अधिकारी, कर्मचारी संपकाळात पूर्णवेळ कार्यरत राहणार आहेत.
- पवनकुमार कछोट, मुख्य अभियंता, महावितरण
वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’ लागू
महावितरणमधील वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. व्यवस्थापनाकडून वारंवार सकारात्मक चर्चा व आवाहन करूनही संयुक्त कृती समितीने संपाचा निर्णय कायम ठेवला आहे. वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम (मेस्मा) लागू करण्यात आला आहे, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.