जिथे दिसशील तेथे मारून टाकेन, लिव्ह-इनमध्ये राहण्यास नकार, प्रियकराचा प्रेयसीवर शस्त्राने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 19:58 IST2026-01-06T19:58:28+5:302026-01-06T19:58:34+5:30
रुग्णालयात उपचार घेऊन तरुणीने पुंडलिकनगर पोलिसांकडे तक्रार केली.

जिथे दिसशील तेथे मारून टाकेन, लिव्ह-इनमध्ये राहण्यास नकार, प्रियकराचा प्रेयसीवर शस्त्राने वार
छत्रपती संभाजीनगर : सततच्या वादामुळे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणारी प्रेयसी आईकडे राहण्यास निघून गेल्याने प्रियकराने तिच्या घरी जात तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. शिवाय, जेथे दिसशील तेथे मारून टाकेन, अशी धमकीदेखील दिली. ४ जानेवारी रोजी पुंडलिकनगर परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी कृष्णा शेषनारायण उदावंत (२८, रा. अजिंक्यनगर, हिंदूराष्ट्र चौक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
१८ वर्षीय तरुणीने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. तिने तक्रारीत केलेल्या आरोपानुसार, चार वर्षांपूर्वी तिची कृष्णा उदावंतसोबत ओळख झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होत तरुणी कृष्णासोबत काही दिवसांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होती. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्यात होत असलेल्या सततच्या वादाला कंटाळून संबंधित तरुणी कृष्णाला सोडून आपल्या आईकडे राहण्यास गेली. ४ जानेवारी रोजी कृष्णाने तिच्या घरी जात धिंगाणा घातल्याचा प्रकार पुढे आला. सोबत चलण्याचा हट्ट करून स्वत:च्या गळ्यावर शस्त्र ठेवून आत्महत्या करण्याची धमकी ४ जानेवारी रोजी दिली. त्यानंतरही तरुणीने सोबत जाण्यास नकार देताच त्याच शस्त्राने तिच्या हातावरसुद्धा वार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिवाय, बाहेर जिथे भेटशील तेथे मारून टाकेन, अशी धमकी देत पसार झाला. रुग्णालयात उपचार घेऊन तरुणीने पुंडलिकनगर पोलिसांकडे तक्रार केली. अंमलदार केशव कसारे अधिक तपास करत आहेत.
आत्महत्या करण्याची दिली धमकी
रविवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान कृष्णा उदावंतने तक्रारदार तरुणीचे घर गाठून सोबत चल असा हट्ट धरला होता. परंतु, तिने सोबत येण्यास नकार दिल्याने कृष्णाने स्वत:च्या गळ्यावर शस्त्र ठेवून आत्महत्या करण्याची धमकी दिली. यानंतर तरुणीच्या हातावर वार करून तो पसार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
शाळेत असतानाच पडली प्रेमात
तक्रारदार तरुणीची शाळेत असताना कृष्णासोबत ओळख झाली होती. तेव्हाच ती त्याच्या प्रेमात पडली. त्याच्यासोबत राहत असताना तिने एका ग्रामीण भागातील महाविद्यालयात अकरावी, बारावीसाठी प्रवेश घेतला. त्याच दरम्यान तरुणी कृ़ष्णासोबत त्याच्या अजिंक्यनगरच्या घरी राहण्यास गेली होती.