मी घाबरणारा नाही, मला ते विकतही घेऊ शकत नाहीत; जलील यांचे शिरसाट यांना थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 18:11 IST2025-06-12T18:09:02+5:302025-06-12T18:11:27+5:30
शिरसाट यांनी बाजारभावापेक्षा कमी दरात स्टेशन रोडवरील हॉटेलची खरेदी केली. तसेच शेंद्रा एमआयडीसी येथे लिकर कंपनीसाठी आरक्षण उठवून जागा खरेदी केली, असे आरोप जलील यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते.

मी घाबरणारा नाही, मला ते विकतही घेऊ शकत नाहीत; जलील यांचे शिरसाट यांना थेट आव्हान
छत्रपती संभाजीनगर : माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरावर शेण फेकण्याची धमकी आल्यानंतर पोलिसांनी जलील यांच्या हिमायतबाग परिसरातील निवासस्थानासमोर मोठा बंदोबस्त लावला. मी घाबरणारा नाही, मला ते विकतही घेऊ शकत नाहीत. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आतापर्यंत जेवढ्या जमिनी खरेदी केल्या, त्या सर्व जमिनींची कागदपत्रे माझ्याकडे आहेत. त्यामुळे शिरसाट यांनी कुठेही चर्चेसाठी बोलावले तर मी येण्यासाठी तयार असल्याचे जलील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
शिरसाट यांनी बाजारभावापेक्षा कमी दरात स्टेशन रोडवरील हॉटेलची खरेदी केली. तसेच शेंद्रा एमआयडीसी येथे लिकर कंपनीसाठी आरक्षण उठवून जागा खरेदी केली, असे आरोप जलील यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. सहजापूर येथे गायरान जमीन मुलाच्या नावाने खरेदी केल्याचा आणखी एक आरोप बुधवारी जलील यांनी पत्रकार परिषदेत केला. सहजापूर येथे गट क्र. ८ मध्ये १० एकर गायरान जमीन शिरसाट यांनी फक्त १ कोटी १० लाख रुपयांना घेतली. लक्ष्मण भिका बनसोडे यांच्याकडून ही जमीन घेतली. ती मिळवून देण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप जलील यांनी केला. सहजापूरसह अन्य दोन ठिकाणी खासगी जमिनी घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. जमीनखरेदीच्या सर्वच प्रकरणांमध्ये मी लोकशाही मार्गाने शिरसाट यांच्यासोबत कुठेही चर्चेला तयार असल्याचे जलील यांनी स्पष्ट केले.