नवस बोलो म्हणून दूर राहायचा, समलैंगिकतेचे गुपित उघड होताच पतीचा पत्नीवर खुनी हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 12:22 IST2026-01-23T12:21:47+5:302026-01-23T12:22:19+5:30
तणावाखाली गेलेल्या तरुणीची पोलिसांकडे धाव, पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल

नवस बोलो म्हणून दूर राहायचा, समलैंगिकतेचे गुपित उघड होताच पतीचा पत्नीवर खुनी हल्ला
छत्रपती संभाजीनगर : मुलगा समलैंगिक असल्याचे माहिती असतानाही कुटुंबाने त्याचे लग्न लावले. मुलीच्या वडिलांकडून लाखोंचे सोने, रोख रक्कम हुंडा म्हणून स्वीकारला. लग्नानंतर पती समलैंगिक असल्याचे समजल्यानंतर मुलीने सासरच्यांकडे तक्रार केली. मात्र, पतीसह सासरच्यांनी तिला मारहाण करत अतोनात छळ करून माहेरी पाठवले. या प्रकारामुळे तणावाखाली गेलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून छावणी ठाण्यात नाशिक जिल्ह्यातील अंदरसुल येथील गणेश नावाच्या तरुणासह त्याच्या संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला.
३२ वर्षीय तरुणीचा मे २०२५ मध्ये गणेशसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर मात्र गणेशने देवाला नवस बोलल्याचे कारण देत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यानंतर गणेशने तिच्याशी संवाद बंद केला. तरुणीने सातत्याने त्याच्याशी मोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने नकार दिला. तिने वैद्यकीय उपचारांचा पर्याय देखील दिला. मात्र, मुलीला मुलाच्या समलैंगिक असल्याबाबत संशय आल्याचे कळाल्यानंतर सासरच्यांनी तिच्यावर विविध संशय घेत छळ सुरू केला.
तरुणीलाच १५ लाखांची मागणी
पतीकडून सांसारिक सुख हवे असल्यास तू वडिलांकडून १५ लाख रुपये घेऊन ये, अशी अट ठेवत मारहाण सुरू केली. तरुणीने हा प्रकार भावाला सांगितला. तेव्हा भावाने तिच्या पतीसोबत बोलण्याचा प्रयत्न करून वैद्यकीय उपचारांचा पर्याय ठेवला. मात्र, तरुणीच्या पतीने त्यालाच मारहाण केली. तरुणीची शैक्षणिक कागदपत्रे, दागिने ताब्यात घेतले.
तक्रार न करण्यासाठी विनवण्या
९ सप्टेंबर २०२५ रोजी पुन्हा तरुणीला गणेशने मारहाण केली. यामुळे तिने पोलिसांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला. तेव्हा गणेशच्या कुटुंबाने सामोपचाराने मिटवण्यासाठी विनवण्या केल्या. त्याच्या काही दिवसांतच त्याचे अमर नावाच्या मित्रासोबत समलैंगिक संबंध असल्याचे उघड झाले. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी तो कायम तरुणीच्या अनुपस्थितीत घरी येत असल्याचे तरुणीला समजले. तेव्हा तरुणीने तीव्र आक्षेप नोंदवल्याने वाद वाढले व गणेशने तिला बेदम मारहाण करून खोलीत डांबून दुसऱ्या दिवशी सकाळी माहेरी पाठवून दिले. माहेरी आलेली तरुणी दोन महिने तणावाखाली होती. त्यानंतर तिने छावणी पेालिसांकडे तक्रार दिली. त्यावरून २१ जानेवारी रोजी गणेशसह त्याच्या कुटुंबावर फसवणूक, कौटुंबिक छळ, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.