पत्नीच्या प्रियकरावर गोळ्या झाडून कुख्यात गुन्हेगार पती फरार; रक्तबंबाळ तरुण पोलिस ठाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 19:11 IST2025-06-06T19:10:13+5:302025-06-06T19:11:26+5:30

गंगापूर शहरात भरदिवसा गोळीबार; फरार आरोपीच्या शोधासाठी तीन पथके रवाना

Husband escapes after shooting wife's lover; Young man in a bloody state goes straight to police station | पत्नीच्या प्रियकरावर गोळ्या झाडून कुख्यात गुन्हेगार पती फरार; रक्तबंबाळ तरुण पोलिस ठाण्यात

पत्नीच्या प्रियकरावर गोळ्या झाडून कुख्यात गुन्हेगार पती फरार; रक्तबंबाळ तरुण पोलिस ठाण्यात

गंगापूर : कुख्यात गुन्हेगाराने त्याच्या पत्नीचा प्रियकर असलेल्या पूर्वाश्रमीच्या २८ वर्षीय मित्रावर भरदिवसा गावठी कट्टयातून गोळीबार केल्याची घटना गंगापूर शहराच्या जवळ छत्रपती संभाजीनगर मार्गावरील एका चहाच्या हॉटेलमध्ये गुरुवारी (दि.५) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या गोळीबारात सदरील तरुण गंभीर जखमी झाला आहे. आदिनाथ दिलीप जाधव असे जखमीचे, तर महेश काशीनाथ काळे (वय ३०, रा. जामगाव) असे आरोपीचे नाव आहे.

गंगापूर तालुक्यातील जामगाव येथील आदिनाथ दिलीप जाधव व महेश काशीनाथ काळे हे पूर्वाश्रमीचे मित्र आहेत. महेशच्या पत्नीचे आदिनाथ सोबत प्रेमसंबंध असल्याने या दोघांत वाद झाला. त्यामुळे त्यांच्यात संवाद नव्हता. या पार्श्वभूमीवर आदिनाथ जाधव हा गुरुवारी दुपारी गंगापूर शहरापासून एक किमी अंतरावर छत्रपती संभाजीनगर मार्गावर असलेल्या हॉटेलमध्ये मित्रांसोबत चहा घेत होता. दीड वाजेच्या सुमारास आरोपी महेश काळे हा तेथे आला. त्यानंतर आदिनाथ व महेश यांच्यात वाद झाला. त्यानंतर महेशने स्वतः जवळील गावठी कट्ट्यातून आदिनाथवर तीन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी आदिनाथच्या पोटात गेली तर दोन गोळ्या त्याला चाटून गेल्या. गोळीबारात त्याच्या पोटाला व मांडीला गंभीर दुखापत झाली आहे. गोळीबार नंतर आरोपी महेश काळे हॉटेलच्या मागच्या बाजूने फरार झाला. आदिनाथ सोबतचे मित्र हा वाद सुरू असताना गायब झाले. आदिनाथवर गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमी अवस्थेत स्वतः पोलिस स्टेशनमध्ये हजर
आदिनाथवर गोळीबार झाल्यानंतर झटापटीत महेश काळेचा कट्टा घटनास्थळी पडला. यानंतर जखमी अवस्थेत आदिनाथ स्वतः आपली दुचाकी चालवत गंगापूर पोलिस ठाण्यात हजर झाला व महेशने माझ्यावर गोळीबार केल्याचे सांगून त्याने महेशचा कट्टा पोलिसांच्या स्वाधीन केला. दरम्यान पोलिसांनी तपासासाठी तीन पथकांची स्थापना केली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

आरोपी महेश काळे याच्याविरुद्ध १४ गुन्हे
आरोपी महेश काळे याच्याविरुद्ध गंगापूर, विरगाव, वाळुज,नेवासा, एमआयडीसी अहिल्यानगर आदी पोलिस ठाण्यात एकूण १४ गुन्हे दाखल असून त्यात बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे, दरोडा, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, वाळू चोरी, दुखापत करणे, जाळपोळ करणे आदी प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. काळे यास गंगापूर पोलिसांनी जामगाव येथे कारखाना परिसरात १० ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतले होते. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी त्याला छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुलच्या मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. महेश व आदिनाथ हे दोघे जीवलग मित्र असून महेशने आदिनाथवर गोळी का झाडली ? याबद्दल उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

पत्नीच्या प्रेम संबंधातून केला गोळीबार
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महेश काशिनाथ काळे याच्या पत्नीचे जखमी आदिनाथ दिलीप जाधव याच्यासोबत प्रेसंबध होते. याच रागातून महेशने आदिनाथवर गोळीबार केला. याप्रकरणी आदिनाथ जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून महेश काळे याच्याविरूद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून त्याच्या पत्नीच्या जीवाला धोका असल्याने पोलिसांनी सदरील महिलेस गंगापूर पोलिस ठाण्यात सायंकाळी आणल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Husband escapes after shooting wife's lover; Young man in a bloody state goes straight to police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.