सिक्युरिटी गार्डच्या मुलाची गगनभरारी, बारावीत मिळवले ९४ टक्के गुण; सीए होण्याचे स्वप्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 11:48 IST2025-05-06T11:48:14+5:302025-05-06T11:48:44+5:30
मुलाला बारीवी कॉमर्समध्ये ९४ टक्के गुण मिळाले तेव्हाही सिक्युरिटी गार्ड वडील हे ड्यूटीवर हजर होते.

सिक्युरिटी गार्डच्या मुलाची गगनभरारी, बारावीत मिळवले ९४ टक्के गुण; सीए होण्याचे स्वप्न
छत्रपती संभाजीनगर : आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संघर्ष करत आपल्या मुलाचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी झटणाऱ्या त्या बापाचा उर आज अभिमानाने भरून आला. बापाने स्वत: झिजलेली चप्पल वापरली, सायकलवर फिरला. मुलानेही कष्ट उपसले, हाल सोसले. १२-१२ तास अभ्यास करत दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केला. अखेर आज त्या कष्टाचे, मेहनतीचे फळ बाप-लेकाला मिळाले. रुपेश रवींद्र उगले या विद्यार्थ्याने बारीवी कॉमर्समध्ये ९४ टक्के गुण मिळवले. जेव्हा मुलाचा निकाल लागला तेव्हाही रुपेशचे सिक्युरिटी गार्ड वडील हे ड्यूटीवर हजर होते.
इमारतींची सुरक्षा करणारे, उन्हातान्हात, पावसात तासनतास उभे राहणारेे वडील रवींद्र उगले म्हणाले, 'मुलगा मोठा व्हावा, हेच माझे स्वप्न होते. आज ते स्वप्न खरे होताना पाहून उर भरून येत आहे. ‘रुपेश हा उज्ज्वलाताई पवार महाविद्यालयाचा विद्यार्थी. त्याच्याकडे अभ्यासासाठी स्वत:चा मोबाइल नव्हता, पण जिद्द होती. वडील कामावर जाताना त्याला कायम एकच गोष्ट सांगायचे, 'आपण गरीब असू शकतो, पण आपलं स्वप्न मोठं असलं पाहिजे.'
सीए होण्याचे आहे स्वप्न
आता रुपेशचे स्वप्न आहे चार्टर्ड अकाउंटंट होण्याचे. आणि हे स्वप्न आता दूर नाही. तुझ्या या यशाचे श्रेय तू ूकोणाला देशील यावर तो म्हणाला, आई-वडिलांनी माझ्यासाठी घेतलेली मेहनत, केलेला त्याग मला नेहमीच दिसत होता. त्यामुळे या यशाचे संपूर्ण श्रेय त्या दोघांचे आहे. त्यासोबतच ज्या गुरूंच्या मदतीशिवाय मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो ते आशिष मालानी सर. यांच्या मदतीमुळे अभ्यासातल्या अनेक अडचणी दूर झाल्या.
कधी हट्ट केला नाही
मुलाने मिळवलेले यश आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप खास आहे. कारण, आमच्या कुटुंबात यापूर्वी एवढे टक्के कोणीच मिळवले नव्हते. ९० च्या पुढे जाणारा रुपेश हा आमच्या घरात एकटाच आहे. परिस्थिती कशीही असली तरी त्याने कधी तक्रार केली नाही. माझ्या तुटपुंज्या पगारावर त्याने कधी हट्ट केला नाही. त्यामुळेच आजचा दिवस आम्ही पाहू शकलो.
-रवींद्र उगले