धक्कादायक! १२ वीच्या परीक्षा केंद्रावर खासगी क्लासचे ११ शिक्षक बनले पर्यवेक्षक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 18:00 IST2025-02-24T17:59:16+5:302025-02-24T18:00:17+5:30
HSC Exam Mass Copy: फुलंब्री तालुक्यातील आदर्श विद्यालयाच्या परीक्षा केंद्रांवरील आणखी एक घोळ

धक्कादायक! १२ वीच्या परीक्षा केंद्रावर खासगी क्लासचे ११ शिक्षक बनले पर्यवेक्षक
- रऊफ शेख
फुलंब्री : तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील आदर्श विद्यालयात सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षा केंद्रांवर आडगाव बु. येथील काशीराम विद्यालयाच्या नावावर छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी कोचिंग क्लासचे ९, तर खासगी इंग्रजी शाळांचे दोन शिक्षक पर्यवेक्षक म्हणून काम पाहात असल्याची बाब उघड झाली आहे.
पिंपळगाव वळण येथील आदर्श विद्यालयात बारावीच्या परीक्षा केंद्राला शनिवारी दुपारी १२:०० वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी अचानक भेट दिली असता येथे सामूहिक कॉपी आढळली. याप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून २८ जणांविरूद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर याप्रकरणाचा तपास पोलिस करीत असले तरी येथे पर्यवेक्षक म्हणून काम करण्यासाठी केलेला घोळ समोर आला आहे. खासगी किवा जिल्हा परिषद शाळेचा काडीमात्र सबंध नसताना छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी कोचिंग क्लासचे ९ शिक्षक, तर बाजारसांवगी येथील दोन इंग्रजी शाळेच्या दोन शिक्षकांनी आडगाव बु. येथील काशीराम विद्यालयाच्या लेटर हेडचा उपयोग करून पर्यवेक्षक म्हणून आपली वर्णी लावल्याची चर्चा आहे. काशीराम विद्यालयाच्या वतीने पर्यवेक्षक म्हणून दाखविलेले व्ही. व्ही. नलावडे हे बाजारसांवगी येथील रायझिंग स्टार इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक आहेत, तर आर. आर. वेताळ हे बाजारसांवगी येथीलच साई पब्लिक इंग्लिश स्कूलचे शिक्षक आहेत. एस. यु. भोपळे हे डोंगरगाव कवाड येथील जिल्हा परिषद शाळेत नुकतेच मुख्यमंत्री युवा कौशल योजनेत अंशकालीन शिक्षक म्हणून रूजू झाले आहेत. असे असताना ते आदर्श विद्यालयात पर्यवेक्षक म्हणून काम पाहात असल्याचे समोर आले आहे.
काशीराम विद्यालयाच्या नावाने केंद्रावर कार्यरत शिक्षक
पी. ए. जाधव, नेहा लगड, एस. यु. भोपळे, ए. एन. सुरडकर, आर. आर. वेताळ, आर. बी. झाला, ए. बी. जाधव, पी. एस. वाकळे, एम. डी. पाटील, व्ही. व्ही. नलावडे, एल. के. डोळस हे सर्व ११ शिक्षक काशीराम विद्यालयाच्या वतीने परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून परीक्षा सुरू झाल्यापासून काम पाहत होते. प्रत्यक्षात त्यांचा या शाळेशी काहीही संबंध नाही.
११ शिक्षक आमचे नाहीतच : मुख्याध्यापक मगर
आदर्श विद्यालयातील सामूहिक कॉपी प्रकरणात ज्या शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यामधील १२ पैकी ११ शिक्षक आमच्या शाळेचे नाहीत. केंद्र संचालकाने आमच्या शाळेच्या लेटरहेडचा गैरवापर करून आमच्या शाळेचे असल्याचे दाखविले. ही बाब गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्हाला समजली. याविषयी आम्ही तक्रार करणार आहोत.
-पंडित मगर, मुख्याध्यापक, काशीराम विद्यालय
‘ते’ कर्मचारी गरुडझेप अकॅडमीचे ?
आदर्श विद्यालयाच्या परिक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून काम करणारे ते ९ शिक्षक गरुडझेप अकॅडमीचे असल्याची शिक्षण वर्तुळात चर्चा होती. या अनुषंगाने गरुडझेप अकॅडमीचे संचालक सुरेश सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे ९ शिक्षक गरुडझेप अकॅडमीचे नसल्याचे सांगितले. त्यामुळे हे शिक्षक काशीराम विद्यालयाचे किंवा गरुडझेप अकॅडमीचे नसतील तर मग कोणत्या शाळेचे आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
२८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी क्रांती धसवाडीकर यांच्या फिर्यादीवरून संस्था अध्यक्ष लताबाई काशिनाथ जाधव, सचिव योगेश काशिनाथ जाधव, पर्यवेक्षक पी. ए. जाधव, नेहा लगड, एस. यू. भोपळे, पी. एस. काकडे, ए. बी. थोरात, ए. एन. शेख, के. बी. पवार, एस. जी. लोखंडे, ए. एन. सुरडकर, ए. बी. गायकवाड, आर. आर. वेताळ, पी. के. घुगे, एन. एस. ठाकूर, आर. बी. झाला, ए. बी. जाधव, व्ही. डी. तायडे, पी. एस. वाकळे, एम. डी. पाटील, व्ही. व्ही नलावडे, एल. के. डोळस, जे. बी. पवार, एस. टी. निर्मळ, बैठे पथकातील तलाठी आर. एस. देशमुख, पोलिस जमादार पंकज पाटील, होमगार्ड बी. एस. चव्हाण, जे. बी. पवार अशा एकूण २८ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.