HSC Exam: बायलॉजीच्या पेपरला कॉप्यांचा पडला पाऊस; संस्थाचालकासह १५ जणांवर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 11:53 IST2025-02-28T11:52:42+5:302025-02-28T11:53:19+5:30
वैजापूर तालुक्यातील कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार

HSC Exam: बायलॉजीच्या पेपरला कॉप्यांचा पडला पाऊस; संस्थाचालकासह १५ जणांवर गुन्हे
छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील निमगावच्या कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या परीक्षा केंद्राला माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्या भरारी पथकाने गुरुवारी (दि.२७) भेट दिली. हे पथक केंद्रावर पोहोचताच हॉलच्या खिडक्यांमधून कॉप्याचा पाऊस पडून खाली ढिगारा लागला. त्यात गाईड, स्पार्क गाईड, मायक्रो झेरॉक्स, नवनीतसह कॉप्यांचा खच होता. शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संस्थेचे अध्यक्ष, सचिव, केंद्र संचालकांसह १५ पर्यवेक्षकांविरुद्ध दोन गुन्हे नोंदविल्याची माहिती शिक्षणाधिकारी लाठकर यांनी दिली.
बारावीच्या परीक्षेत गुरुवारी जीवशास्त्र विषयाचा पेपर होता. कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालयातील केंद्राला शिक्षणाधिकारी लाठकर, विस्तार अधिकारी जयेश चौरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या पथकाने भेट दिली. पथकास इमारतीच्या आजूबाजूला परीक्षा दालनाबाहेर कॉप्याचा ढीग लागल्याचे दिसून आले. पथकाने केंद्रात प्रवेश करताच खिडक्यांमधून चिठ्ठ्यांचा पाऊस पडला. या प्रकारची गंभीर दखल घेत शाळेचे अध्यक्ष, सचिव, केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकांनी विद्यार्थी तपासणीत अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या विरोधात स्वतंत्र दोन गुन्हे नोंदविण्याचा निर्णय घेतला.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, सीईओ विकास मीना यांनीही संंबंधितांवर गुन्हे नोंदविण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार शिक्षणाधिकारी लाठकर यांनी वैजापूर गटशिक्षाणाधिकाऱ्यांना आदेशित केले. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली.
एका विद्यार्थ्यावर कारवाई
केंद्रातील बहुतांश विद्यार्थ्यांनी जवळील कॉपी बाहेर फेकून दिली. मात्र, तरीही एका विद्यार्थ्याने स्वत:जवळ गाईड बाळगल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या विरोधातही कारवाई केली. तसेच एका हॉलवर प्रयोगशाळा साहाय्यकास पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यामुळे त्या प्रकरणात केंद्र संचालकासह इतरांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात येत असल्याचेही लाठकर यांनी सांगितले.
सीईओंची फुलंब्री तालुक्यात तपासणी
जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास विकास मीना यांनी फुलंब्री तालुक्यातील जानेफळ व खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी, सुलतानपूर येथील परीक्षा केंद्रांवर भेटी देऊन पाहणी केली. या केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळला नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
यांच्यावर दाखल झाले गुन्हे
केंद्राच्या परिसरात कॉपी सापडल्यामुळे संस्थाध्यक्ष जी.एस. पवार, सचिव वैशाली पवार, केंद्र संचालक प्राचार्य अजीनाथ काळे, एस.एस. आहेर, व्ही.एस. काटे, सी.यू. जाधव, एस.बी. गुंजाळ, के.के. धाटबळे, एच.बी. खंडीझोड, जे.डी. कुंदे, आर.बी. जाधव, व्ही.जी. पवार, जी.एस. डोरले, ए.एस. निकम, आर.व्ही. कुदड, के.एस. सोनवणे, आर.बी. नरोडे या १७ जणांच्या विरोधात शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले.
यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा
बनावट कागदपत्रांवर पर्यवेक्षक नेमल्याबद्दल गॅलेक्सी इंटरनॅशनलचे प्राचार्य चांगदेव जाधव, प्रयोगशाळा सहायक कैलास धाटबळे आणि केंद्र संचालक प्राचार्य अजिनाथ काळे यांच्या विरोधात फसवणुकीचा स्वतंत्र गुन्हा नोंदवला आहे.