४ दिवसांत ८ लाख वाहनांना कशी बसवणार ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट? पुन्हा मुदतवाढ मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 17:00 IST2025-08-12T16:54:27+5:302025-08-12T17:00:01+5:30
एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी खूप उशिराची अपाॅइंटमेंट मिळत आहे. त्यामुळे ही नंबर प्लेट बसविण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढवून देण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.

४ दिवसांत ८ लाख वाहनांना कशी बसवणार ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट? पुन्हा मुदतवाढ मिळणार?
छत्रपती संभाजीनगर : एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) लावण्यास १५ ऑगस्टची मुदत आहे. अद्यापही जिल्ह्यातील ८ लाख वाहनांना ही नंबरप्लेट बसवलेली नाही. त्यामुळे आगामी ४ दिवसांत या वाहनांना नंबरप्लेट बसणार कशी, असा सवाल आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारीत एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी एजन्सी निश्चित झाली होती. आतापर्यंत दोन वेळा ही नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे. आता पुन्हा एकदा मुदतवाढ मिळते का, याकडे वाहनधारकांचे लक्ष आहे.
एचएसआरपी नंबर प्लेटसाठी १५ ऑगस्टची मुदत
एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठीची अंतिम मुदत पूर्वी ३१ मार्च होती, त्यानंतर ३० जून करण्यात आली. आता १५ ऑगस्टची मुदत आहे.
जिल्ह्यात वाहने १२ लाख, एचएसआरपी ३ लाख वाहनांनाच
जिल्ह्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीची ९ लाख ५४ हजार वाहने आहेत. यात आतापर्यंत केवळ १ लाख २६ हजार २५२ वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आली. तर २ लाख १४ हजार ५५६ वाहनांनी नंबर प्लेट बसविण्यासाठी नोंदणी केली आहे.
पाच हजारांचा दंड बसणार
या नंबर प्लेटसाठी नोंदणी केली नाही तर १५ ऑगस्टनंतर कारवाईचा बडगा बसणार आहे. नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनाला ५ हजारांपर्यंत दंड बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुदत वाढवण्याची मागणी
एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी खूप उशिराची अपाॅइंटमेंट मिळत आहे. त्यामुळे ही नंबर प्लेट बसविण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढवून देण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.
नोंदणी, कागदपत्रे अन् प्रक्रिया काय?
वाहनधारकाने एचएसआरपीसाठी अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीवेळी वाहनाचा आरसी बुक, नोंदणी क्रमांक आणि चेसिस क्रमांक आवश्यक असतो. दिलेल्या तारखेला वाहन केंद्रावर आणून ही प्लेट बसवून घ्यावी लागते.