गुंतवणूक करताना रहा सतर्क, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७४५ पतसंस्था; आतापर्यंत ९ गुन्हे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 17:55 IST2025-04-30T17:49:04+5:302025-04-30T17:55:02+5:30
गुंतवणूक करताना नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

गुंतवणूक करताना रहा सतर्क, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७४५ पतसंस्था; आतापर्यंत ९ गुन्हे!
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात तब्बल ७४५ पतसंस्था कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये हजारो नागरिकांनी आपल्या ठेवी विश्वासाने ठेवलेल्या आहेत. मात्र, असे असतानाही गैरव्यवहारामुळे काही पतसंस्था डबघाईला आल्या असून, अशा ९ पतसंस्थांच्या चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे गुंतवणूक करताना नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील पतसंस्थांची संख्या :
१) नागरी पतसंस्था - ३०२
२) ग्रामीण पतसंस्था - १०१
३) नोकरदारांच्या पतसंस्था - ३३०
४) प्राथमिक सहकारी नागरी बँका - १२
गुन्हे दाखल होण्याची प्रमुख कारणे :
१) ठेवीदारांची फसवणूक करणे
२) निधी परस्पर वळवणे
३) बेकायदेशीर व्यवहार करणे
पतसंस्थांचे व्याजदर जास्त
पतसंस्थांमध्ये बचत खात्यावर ५ ते ७ टक्के, तर मुदत ठेवींवर ८ ते १० टक्क्यांपर्यंत व्याजदर दिले जातात. राष्ट्रीयीकृत बँकांच्या तुलनेत हे दर २ ते ३ टक्क्यांनी अधिक आहेत. त्यामुळे अनेक खातेदार पतसंस्थांकडे आकर्षित होतात. बहुतांश पतसंस्था आपले काम प्रामाणिकपणे पार पाडत असल्या, तरी काही मोजक्या संस्थांतील गैरव्यवहारांमुळे सर्व पतसंस्थांकडे बघण्याची दृष्टी बदलते.
पतसंस्थेचा इतिहास तपासणे आवश्यक
पतसंस्था आर्थिक पाठबळ देण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मात्र, गुंतवणूकदारांनी संस्थेचा इतिहास तपासूनच गुंतवणूक करावी. संस्थेचा आर्थिक अहवाल, एनपीए (थकबाकी) प्रमाण, वार्षिक सभांचे विवरण आणि वसुलीची स्थिती पाहणे अत्यावश्यक आहे. केवळ जास्त व्याजाच्या आमिषाला बळी पडू नये.
मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.