शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी हवालदिल!

By admin | Updated: June 17, 2014 01:09 IST

औरंगाबाद : गेल्यावर्षी जिल्ह्यात वरुणराजाने रोहिणी नक्षत्रापासूनच कृपा केल्याने मृग नक्षत्रातच पेरणी झाली.

औरंगाबाद : गेल्यावर्षी जिल्ह्यात वरुणराजाने रोहिणी नक्षत्रापासूनच कृपा केल्याने मृग नक्षत्रातच पेरणी झाली. त्यामुळे खरिपाचे पीक दमदार निघाले. यंदा मात्र तसा योग आतापर्यंत तरी आलेला नाही. मृग नक्षत्र संपण्यास अवघे आठ दिवस उरले असून, जिल्ह्यात कोठेही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणी होण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. यंदा वेळेवर पेरण्या होतील ही बळीराजाची आशा फोल ठरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्यावर्षी बऱ्यापैकी उत्पन्न मिळवणारा शेतकरी यावेळी गॅसवरच आहे.खुलताबाद : मृग नक्षत्रास सुरुवात होऊन आठ दिवस झाले तरी खुलताबाद तालुक्यात पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांचे आभाळाकडे लक्ष लागून आहे. बी-बियाणांच्या खरेदीसाठी बाजारात लगबग सुरू आहे.खुलताबाद तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ४८,८८६ हेक्टर इतके असून, त्यापैकी लागवडीलायक क्षेत्र ३४,२२७ हेक्टर आहे. खरीप पेरणी सरासरी क्षेत्र ३३,२०० हेक्टर इतके आहे.पावसाने हजेरी न लावल्याने पेरण्या जवळपास खोळंबल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर, तसेच ठिबकवर लागवड केली आहे. बी-बियाणे, रासायनिक खतांचा मुबलक साठा असून, शेतकऱ्यांचा मका व कापूस पीक लागवडीकडे कल आहे. तालुक्यात आजपर्यंत कुठल्याच भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. औरंगाबाद : अर्धा जून महिना संपला तरीही औरंगाबाद तालुक्यात पाऊस न पडल्याने पेरण्या रखडल्या आहेत. शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागले असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत वरुणराजाला साकडे घालत आहे. तालुक्यात गेल्या वर्षी पाऊस वेळेवर आला. त्यामुळे जून महिन्यात जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या होत्या; परंतु यावर्षी रोहिणी नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले आहे. जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी शेतीची मशागत पूर्ण केली आहे. तालुक्यात कापूस, मका, बाजरी, तूर घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. यावर्षी अद्यापही नजर जाईल तेथपर्यंत शेतात उन्हाळ्याचे वातावरण आहे. त्यामुळे पावसाळा लागूनही शेतात शेतकऱ्यांची वर्दळ दिसत नाही. त्यामुळे शेतात अजूनही सन्नाटा दिसत आहे. शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे. वरुणराजाची तो प्रार्थना करीत आहे. जून महिन्यात वेळेवर पाऊस पडला तर बी-बियाणे, खते घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसते; परंतु अजूनही बियाणांच्या दुकानात सामसूम दिसत आहे.पैठण : मृग नक्षत्र लागून आठवडाभराचा कालावधी लोटला; परंतु पावसाचे आगमन न झाल्याने बळीराजा चिंतातुर झाला आहे. शेती मशागतीची कामे आटोपून पावसाची प्रतीक्षा असल्याने पेरण्या लांबल्या आहेत. आठवडाभरापासून बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.मृग नक्षत्रातील पेरणी झालेला पिकांचा पेरा जास्त उतरतो. यासाठी बियाणांव्यतिरिक्त इतर जास्तीचा खर्च शेतकऱ्यांना येत नाही. यामुळे मृगाच्या पावसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहतात. यंदा मात्र मृग नक्षत्राचा पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. तालुकाभर शेती मशागतीची कामे उरकण्यात आली आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीसाठी कापूस, तूर, बाजरी, मूग आदी पिकांच्या बियाणांची खरेदी उरकली आहे. असे असले तरी पावसाचे आगमन न झाल्याने पेरण्या लांबत चालल्या आहेत. दोन-चार दिवसांत पाऊस न झाल्यास मुगाच्या पिकावर पाणी सोडावे लागणार आहे.फुलंब्री : वळवाच्या पावसाने पाठ फिरवल्याने धूळ पेरणी केलेल्या शेतातील सरकीचे बी व्हेंटिलेटरवर आहे. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले असून शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.फुलंब्री तालुक्यात खरीप पिकाचे क्षेत्र ५५ हजार हेक्टर आहे. शेतकऱ्यांनी खरीप लागवडीसाठी शेतीची मशागत करून ठेवली. मृग नक्षत्रात जोरदार पाऊस पडेल या आशेवर शेतकरी होते; पण मृग नक्षत्राचे दहा दिवस गेले तरी पाऊस पडला नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.शेतकऱ्यांनी बियाणे, खते घेऊन ठेवली असनू मृग नक्षत्रात पाऊस पडला की, कपाशीची लागवड करण्याची योजना शेतकऱ्यांची होती; पण त्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरताना दिसत आहे.सिल्लोड : शेती मशागतीची कामे आटोपून बळीराजा खरीप पेरणीसाठी मृग नक्षत्राच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. मृग नक्षत्र लागून आठवडा उलटला असला तरी अद्यापपर्यंत पावसाचे आगमन झालेले नाही. पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातुर दिसून येत आहे. गेल्या वर्षी पावसाचे लवकर व जोरदार आगमन झाले होते. यामुळे तालुक्यात मृग नक्षत्रात खरिपाची पेरणी झाली. वेळोवेळी पाऊस पडल्याने पिके जोमात आली. मार्च महिन्यात तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने रबी पिकांचे नुकसान तर झालेच, शिवाय शेती कामांनाही बे्रक लागला. यंदा लग्नसमारंभ मोठ्या प्रमाणात पार पडल्याने शेती कामांमधून वेळात वेळ शेतकऱ्यांना काढावा लागला. यामुळे शेतीची कामे रेंगाळली होती. गंगापूर : पावसाळा सुरू झाल्यापासूनच गंगापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली नाही. पाऊस दगा देतो की काय, या चिंतेने शेतकरी हवालदिल आहे. खरीप हंगामातील पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीची अंतर्गत मशागत करून खते, बी-बियाणे खरेदी केले. रोहिणी नक्षत्र कोरडेच गेले. खरीप हंगामासाठी अत्यंत उपयोगी असलेल्या मृग नक्षत्रास आठवडा उलटला. केवळ दिवसभर कडाक्याचे ऊन व त्यासोबत सोसाट्याचा वारा, सायंकाळी आकाशात दाटून येणारे ढग वारा वाहून नेताना दिसत आहे.मागील वर्षी रोहिणी नक्षत्राबरोबरच मृग नक्षत्रही बऱ्यापैकी बसरल्यामुळेच जून महिन्याच्या आतच खरिपाच्या जवळपास ७५ टक्के पेरण्या झाल्या होत्या. आता मात्र पावसाने सुरुवातीपासूनच दडी मारल्याने सर्वत्र नांगरट व मशागत करून पडलेली शेती उजाड दिसत आहे. खरीप हंगाम लक्षात घेता कृषी सेवा केंद्र चालकांनी मोठ्या प्रमाणात बी-बियाणे, रासायनिक खतांचा साठा करून ठेवला असला तरी पाऊसच नसल्याने ग्राहकांची वाट पाहावी लागत असून, एरव्ही ग्राहकांनी गजबजलेली कृषी सेवा केंद्रे गर्दीविना सुनीसुनी दिसत आहे. सोयगाव : तालुक्यात गेल्या वर्षी १५ जूनपर्यंत १७७ मि. मी. पाऊस पडला होता. ३० टक्के खरीप हंगामाच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र, अद्याप केवळ १६ मि. मी. पाऊस पडला असून, खरिपाच्या पेरण्या सुरू झालेल्या नाहीत. दोन ते अडीच हजार हेक्टरवरील पूर्वहंगामी कपाशीचे क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्र पावसाच्या प्रतीक्षेत आहे.सोयगाव तालुक्यावर वरुणराजा नेहमीच प्रसन्न असतो. यंदा मात्र, वरुणराजाची कृपा झालेली नाही. खरिपासाठी मशागतीची कामे पूर्ण झालेली आहेत. बियाणे, खते खरेदी करून झालेली आहे. शेतकरी पूर्णपणे सज्ज झालेला आहे. परंतु पावसाने हुलकावणी दिलेली आहे. शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे.सोयगाव तालुक्यात गेल्या वर्षी सोयगाव मंडळात १७७ मि. मी., बनोटी १२०, सावळदबारा १३० मि. मी. इतका पाऊस पडला होता. तालुक्यात एकूण सरासरी १५६ मि. मी. पाऊस पडला होता. जवळपास ३० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. पिके उगवून सगळीकडे हिरवळ दिसत होती. यंदा मात्र, ठिबक सिंचनवर केवळ दोन ते अडीच हजार हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस लागवड झालेली आहे. उर्वरित सर्व क्षेत्रात काळी माती दिसत आहे. सोयगाव तालुक्यात ४५ हजार ३५० हेक्टरवर खरीप हंगामाची लागवड होणार आहे. तालुका कृषी विभागामार्फत खरिपाचे नियोजन, पीक विमा, बीज प्रक्रिया आदी विषयांवर जनजागृती करण्यात आलेली आहे. दोन दिवसांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज कृषी अधिकारी व्ही. एस. ठक्के यांनी व्यक्त केला असून, शेतकऱ्यांनी एमआरपीपेक्षा जास्त दराने बियाणे, खते घेऊ नये. असा गैरप्रकार आढळल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन ठक्के यांनी केले आहे. (वार्ताहर)वैजापूर : यंदा मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा उलटूनही तालुक्यात अद्याप पावसाने हजेरी न लावल्याने बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागून आहेत.मागील वर्षी जवळपास १० वर्षांच्या कालावधीनंतर तालुक्यात मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे खरीप पेरण्या लवकर उरकल्या; परंतु मध्यंतरीच्या काळात पावसाने अचानक डोळे वटारल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले. पावसाच्या दीर्घ उघडिपीमुळे खरीप पिकांना फटका बसला. परिणामी बळीराजाच्या हातात फारसे काही आले नाही. गेल्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात तालुक्यात झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. कांदा, ऊस व अन्य पिकांचे मोठे नुकसान या गारपिटीत झाले.तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी नेहमीच अस्मानी संकट पूजलेले आहे. पिके चांगली जोमात असली तर पाऊस दगा देतो अथवा गारपिटीने सर्व काही उद्ध्वस्त होते; परंतु संकटाचा फेरा चुकत नाही. आताही तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागती पूर्ण करून ठेवल्या आहेत. बी-बियाणांची जुळवाजुळव करून ठेवली आहे; परंतु पावसाने तालुक्यात अद्याप हजेरी लावली नसल्याने शेतकरीराजा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अवकाळी पावसामुळे तालुक्यात दाणादाण उडाली; परंतु मोसमी पावसाने अवकृपा केल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यात मोठा पाऊस झाल्यास खरीप पेरण्यांना लगेच वेग येणार आहे. मागील वर्षी कमी झालेले पर्जन्यमान व गारपिटीने शेतकरी आर्थिक विवंचनेत असून, त्याचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे यंदा तरी चांगला पाऊस होऊन नेहमीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडू, अशी भाबडी आशा शेतकऱ्यांना आहे.कन्नड : मागील वर्षी तालुक्यात मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर पडल्याने पेरणी वेळेवर झाली होती. यावर्षीही मृग बरसेल आणि पेरण्या वेळेवर होतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती; मात्र निम्मे मृग नक्षत्र उलटले, तरीही पावसाचे आगमन झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे.कन्नड तालुक्यात १ लाख ७ हजार हेक्टरवर खरीप पिकांचे लागवड क्षेत्र आहे. मागील वर्षी तालुक्यात १०६ टक्के पाऊस पडल्याने जमिनीतील पाण्याची पातळी उंचावली होती. कन्नड कारखाना मागील वर्षी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आणि तालुक्यातील ऊस पिकाच्या क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे, तर दुसरीकडे मागील वर्षी पावसाळ्याच्या उत्तरार्धात जास्त पाऊस पडल्याने कपाशीचे पीक हळूहळू बहरत गेले, ते अगदी एप्रिल महिनाअखेर. त्यामुळे अगदी मे महिन्यातही कापूस वेचणी सुरू होती. मे महिना लग्नसराईचा होता. त्यामुळे शेतीची कामे लांबली होती. मात्र, शेतकऱ्यांनी धावपळ करून शेतीची कामे उरकली; तथापि, निम्मा मृग उलटला तरीही अद्याप पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतातुर आहेत.मृग नक्षत्रात झालेली पेरणी शेतीमाल उत्पादनासाठी लाभदायक असते, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. त्यामुळे बी-बियाणांची खरेदी करून शेतकरी पेरणी करण्यासाठी सज्ज झाला आहे; आता फक्त प्रतीक्षा आहे ती पावसाची. तालुका कृषी अधिकारी एन. आर. कोकाटे यांनी सांगितले की, येत्या आठ दिवसांत पाऊस पडला तर नियमित पिके घेता येतील; मात्र पाऊस लांबला तर नियोजित पिकांमध्ये बदल करावा लागेल.