समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकने आडोशाला जेवणाऱ्या कामगारांना उडवले, ३ ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 16:02 IST2026-03-06T16:02:02+5:302026-03-06T16:02:37+5:30
जेवणासाठी जेसीबीच्या बाजूला बसलेले असताना या कामगारांवर काळाने घाला घातला.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकने आडोशाला जेवणाऱ्या कामगारांना उडवले, ३ ठार
- श्रीकांत पोफळे
करमाड/छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयपुर शिवारात शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या एका अवजड ट्रकने रस्ता दुरुस्तीचे काम करून जेवण करत बसलेल्या पाच कामगारांना उडवले. या भीषण अपघातात तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत.
सावलीत जेवायला बसले अन् 'काळ' आला
मिळालेल्या माहितीनुसार, 'मेघा इंजिनिअरिंग' कंपनीचे पाच कामगार महामार्गावरील लोखंडी क्रॉस बॅरेलच्या दुरुस्तीचे काम करत होते. काम संपवून दुपारच्या जेवणासाठी हे कामगार कंपनीच्या सर्विस ट्रक (MH40BM8048) आणि जेसीबी (MH20FU3208) यांच्या मध्ये असलेल्या सावलीत बसले होते. आवश्यक असलेले सेफ्टी बॅरिकेट्स लावूनच हे काम सुरू होते.
पावणे दोनशे फूट फरपटत नेले
त्याच वेळी जालन्याच्या दिशेने नागपूरकडे लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या एका ट्रकने (MH40CD5355) उभे असलेल्या सर्विस ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की, सर्विस ट्रक कामगारांना चिरडत पुढे उभे असलेल्या जेसीबीवर आदळला. अपघातग्रस्त ट्रकने ही दोन्ही वाहने तब्बल पावणे दोनशे फूट अंतरापर्यंत फरपटत नेली. या भीषण टक्करीत तिघांचा जागीच अंत झाला. या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मृतदेह आणि जखमी कामगारांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.